News Flash

वाशीम जिल्हा परिषदेची निवडणूक २२ डिसेंबरला

वाशीम जिल्हा परिषदेसह जिल्ह्य़ातील रिसोड, मालेगाव, मंगळरुळपीर, मानोरा आणि कारंजा (लाड) पंचायत समितीच्या निवडणुका येत्या २२ डिसेंबरला होणार

| December 3, 2013 07:43 am

वाशीम जिल्हा परिषदेसह जिल्ह्य़ातील रिसोड, मालेगाव, मंगळरुळपीर, मानोरा आणि कारंजा (लाड) पंचायत समितीच्या निवडणुका येत्या २२ डिसेंबरला होणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमलात येणार आहे. जिल्ह्य़ात जिल्हा परिषदेची निवडणूक आचारसंहिता सुरू झाल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने बंद होणार असल्याने आता पदाधिकाऱ्यांना स्वत:ची वाहने वापरण्याची वेळ आली आहे.
वाशीम जिल्हा परिषद व जिल्ह्य़ातील सहा पंचायत समितीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे. यात ३ डिसेंबरला निवडणुकीच्या तारखांची सूचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत. उमेदवारांचे अर्ज देणे व स्वीकारणे ३ ते ७ डिसेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. सोमवारी, ९ डिसेंबरला अर्जाची छाननी व त्यावर निर्णय देणे, वैध उमेदवारांची यादी छाननीनंतर प्रसिद्ध होणार आहे. अर्जाचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची मुदत १२ डिसेंबर असून जिल्हा न्यायाधीशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर ठेवण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीशांनी अपील निकालात काढल्यावर वैद्य उमेदवारांची यादी १६ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जेथे अपील नाही तेथे अर्ज मागे घेण्याची तारीख १४ डिसेंबर असून जेथे अपील आहे त्या ठिकाणी १८ डिसेंबर राहणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप जेथे अपील नाही तेथे १४ डिसेंबरला, तर जेथे अपील आहे तेथे १८ डिसेंबरला करण्यात येणार आहे. १६ डिसेंबरला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होणार असून २२ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सोमवारी, २३ डिसेंबरला मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होऊन २४ डिसेंबरला निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
राज्यातील अकोला, धुळे व नंदूरबार या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या बरोबरीनेच वाशीम जिल्हा परिषदेची निवडणूक होणार होती. परंतु, जिल्हा परिषद गटाचे आरक्षण काढताना महसूल विभागच्या अधिकाऱ्यांनी काही चुका केल्याने काही जणांनी मुबंई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात व विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेचा निकाल देताना खंडपीठाने जिल्हा परिषदेच्या गटाचे फेरआरक्षण काढण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाला दिला होता.
अखेर २७ नोव्हेंबरला जिल्हा प्रशासनाने ५२ जिल्हा परिषद गटांचे फेरआरक्षण काढले.  
शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. २००८ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्हा परिषदेचे ५० गट होते. या निवडणुकीत जिल्हा परिषद गटात दोन गटांची वाढ झाल्याने ५२ गट झाले आहेत.
गेल्या निवडणुकीत वाशीम जिल्हा परिषदेत काँग्रेस १६, राष्ट्रवादी १६, भाजप ९, शिवसेना ६, भारिप-बमसं १, जनसुराज्य पक्ष १ आणि अपक्ष १ असे बलाबल होते. त्यानंतरच्या काळात जनसुराज्य पक्षाचे सदस्य अजय पाटील काँग्रेसमध्ये, तर अपक्ष सुभाष राठोड राष्ट्रवादीत गेल्याने वाशीम जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १७ सदस्य झाले. गेल्या पाच वर्षांत आघाडीची सत्ता होती. आता या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा वाशीम जिल्हा परिषदेवर फडकणार, याची चर्चा सुरू आहे.
वाशीम जि. प. निवडणूक
* यंदा निवडणुकीत ५२ गट
* रिसोड, मालेगाव, मंगळरूळपीर, मानोरा, कारंजा (लाड) या पंचायत समितींच्या निवडणुकाही २२ डिसेंबर रोजी
* ९ डिसेंबरला अर्जाची छाननी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 7:43 am

Web Title: washim district council election on december 22
टॅग : Election,Vidarbh
Next Stories
1 आ. सुनील केदारांना काँग्रेसमधूनच सुरूंग?
2 राणे-भुजबळ सख्खे शेजारी!
3 केंद्राच्या २१.६४ कोटींमुळे नवेगाव व जामणीच्या पुनर्वसनाला गती
Just Now!
X