कायदा-सुव्यवस्थेबरोबरच गुन्हेगारीला आळा बसावा आणि हे करताना दहशतवादी कारवायांवरही पाळत ठेवण्यासाठी दक्षिण मुंबईत ‘टेहळणी टॉवर’ची संकल्पना राबविण्यात येत आहे. तूर्तास हुतात्मा चौकात असा टॉवर उभा करण्यात आला असून परिमंडळ एक परिसरात असे एकूण पाच टेहळणी टॉवर्स उभारण्यात येणार आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी ही संकल्पना मांडली आहे. हुतात्मा चौकात असा टॉवर प्रत्यक्षात उभारण्यात आला आहे. एक शिपाई किमान दोन तास टेहळणी करील. त्यानंतर दुसरा शिपाई त्याची जागा घेईल. आळीपाळीने हे शिपाई दिवसभर टेहळणी करतील. जेव्हा एक शिपाई टेहळणी करीत असेल तेव्हा दुसरा टॉवरखाली शस्र घेऊन उभा असेल. या टेहळणी टॉवरमुळे १० ते १२ पोलिसांचे काम एक पोलीस करील. सोनसाखळी चोरी, बॅग चोरी, मोबाइल वा तत्सम गुन्ह्य़ांवर त्यामुळे जरब येईल, असा विश्वास व्यक्त करताना डॉ. शिसवे म्हणाले की, दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणे दहशतवाद्यांनी निवडली होती. अशा टॉवरमुळे दहशतवादी कारवायांवरही लक्ष ठेवता येईल.
हुतात्मा चौकासह सीएसटी रेल्वे स्थानक, चर्चगेटजवळील इरॉस सिनेमागृह, रिगल सिनेमागृह, मेट्रो सिनेमागृह अशा पाच ठिकाणी टेहळणी टॉवर उभारले जाणार आहेत. या पोलिसांना दुर्बीणही पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे वेगाने जाणाऱ्या गाडय़ांचे क्रमांकही त्यांना टिपून घेता येतील. दक्षिण मुंबईतील बराचसा परिसर असा आहे की, रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांना मर्यादा येतात. २० फुटी टॉवरमुळे चोरांवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. याशिवाय दहशतवादी कारवाया करण्यासाठी होणाऱ्या संशयास्पद हालचालीही या टॉवरमुळे पोलिसांना सहज टिपता येणार असल्याचा विश्वासही डॉ. शिसवे यांनी व्यक्त केला. हे टॉवर्स प्रामुख्याने वाहतूक बेटांवर उभारण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीलाही अडचण होणार नाही.