17 November 2017

News Flash

जलबोगदा निष्फळ

दक्षिण मुंबईतील नागरिकांना अधिक दाबाने स्वच्छ निर्मळ पाणी मिळावे आणि गळतीला आळा बसावा या

प्रसाद रावकर | Updated: December 27, 2012 12:17 PM

दक्षिण मुंबईतील पाण्याचा प्रश्न ‘जैसे थे’
दक्षिण मुंबईतील नागरिकांना अधिक दाबाने स्वच्छ निर्मळ पाणी मिळावे आणि गळतीला आळा बसावा या हेतूने मलबार हिलमधील किलाचंद गार्डन ते क्रॉस मैदान व्हाया एस. के. पाटील उद्यान या दरम्यान उभारण्यात आलेला जलबोगदा निष्फळ ठरला आहे. त्यामुळे महापालिकेला या परिसरातील असंख्य रहिवाशांची तहान आजही भागविता आलेली नाही. तसेच पाणी गळतीचा प्रश्नही ‘जैसे थे’च आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठय़ाचा प्रश्न गंभीर बनला आहे. जीर्ण झालेल्या ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांतून मोठय़ा प्रमाणावर गळती होत आहे. मलवाहिन्यांतील सांडपाणी जलवाहिन्यांमध्ये जात असल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींमधील घरगल्ल्या कचऱ्याने भरल्या असून त्यांची सफाई नियमितपणे केली जात नाही. घरगल्ल्यांतून जाणाऱ्या जलवाहिन्या गंजल्या असून त्यातूनच नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. मात्र त्याकडे ना इमारत मालकाचे लक्ष ना पालिकेचे. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून तळमजल्यावरील टोकाच्या रहिवाशांना पाणी मिळतच नाही. पहिल्या-दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशांना पाण्यासाठी तळमजल्यावरील सार्वजनिक नळावर धाव घ्यावी लागते. परिणामी भल्या पहाटे सार्वजनिक नळावर भांडणाचा खळखळाट दृष्टीस पडत होता. ही स्थिती बदलावी यासाठी पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मलबार हिल येथील किलाचन गार्डन ते स. का. पाटील उद्यान (१.७५ कि.मी. लांबीचा) आणि स. का. पाटील उद्यान ते क्रॉस मैदान (१.८५ कि.मी. लांबीचा) दरम्यान जलबोगदा उभारण्याचा निर्णय घेतला. या जलबोगद्यामुळे पाणी गळतीला आळा बसेल आणि अधिक दाबाने स्वच्छ पाणीपुरवठा होईल असा दावा पालिकेकडून करण्यात आला. १५६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २००७ मध्ये हाती घेण्यात आले आणि फेब्रुवारी २०१२ मध्ये पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जलबोगदा कार्यान्वित करण्यात आला. मोठय़ा धुमधडाक्यात हा जलबोगदा लोकार्पण करण्यात आला असला तरी दक्षिण मुंबईकरांची पाण्याची समस्या आजही सुटलेली नाही. दक्षिण मुंबईची तहान भागविण्यासाठी प्रतिदिनी सुमारे २१६ दशलक्ष लिटर पाणी जलबोगद्यातून वितरित केले जाते. मात्र पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी जलबोगद्यातील पातळी पूर्ण भरणे आवश्यक आहे. ती भरत नसल्यामुळे आजही अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून पहिल्या मजल्यावरही पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. तसेच चाळींच्या जागी उभ्या राहिलेल्या टॉवर्सने मोठे पंप बसवून आसपासच्या परिसराचे पाणी पळविले आहे.  त्यामुळे मोडकळीस आलेल्या चाळीत कसेबसे दिवस काढणाऱ्या रहिवाशांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. कुलाबा, चर्चगेट परिसरातील रहिवाशांना या जलबोगद्याचा फायदा झाला असला तरी उर्वरित दक्षिण मुंबई मात्र तहानलेलीच आहे. या जलबोगद्यातील पाणी लहान जलवाहिन्यांमधून घरोघरी जाते. या लहान जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून त्यांच्या दुरुस्तीबाबत पालिकेकडे कोणतीच योजना नाही. त्यामुळे पाणी गळतीचा प्रश्नही ‘जैसे थे’च आहे.    

First Published on December 27, 2012 12:17 pm

Web Title: water big pipeline is not usefull