उरण तालुक्यातील पाणीकपातीचे संकट दूर झाले असून, तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जलसाठय़ात वाढ झाली आहे. आज पहाटे सहा वाजल्यापासून रानसई धरण भरून वाहू लागले आहे. यामुळे मंगळवार व शुक्रवार या दोन दिवसांतील पाणीकपातही रद्द करण्यात आली असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता एम.के.बोधे यांनी दिली आहे.
उरण तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायत तसेच औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाणी पातळी घटल्याने तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीने दोन दिवसांची पाणी कपात लागू केली होती. मात्र मागील आठवडाभरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे दहा दशलक्ष घनमीटर क्षमता असलेले ११६ फुटी उंचीचे धरण पूर्ण भरून वाहू लागल्याने उरणमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मागील वर्षांपेक्षा महिनाभर उशिराने यावर्षी रानसई धरणे भरले आहे.