उल्हास नदीतील पाण्याची पातळी घटू लागल्याने पाटबंधारे विभागाने लागू केलेल्या १५ टक्के पाणी कपातीचा दुहेरी फटका ठाणे तसेच कल्याण, डोंबिवली या शहरांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या पाणी कपातीमुळे स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला पुरविण्यात येणारे पाणी कमी झाल्याने यापूर्वीच ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांसाठी महिन्यातून दोन वेळा पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही ठाणे आणि डोंबिवली अशा दोन शहरांना पाणी कपातीचा विचार सुरू  केल्याचे खात्रीलायक वृत्त असून, असे झाल्यास आठवडय़ातून एक किंवा दोन वेळा येथील नागरिकांना पाण्यावाचून काढावे लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्टेम यासारखी वेगवेगळी प्राधिकरणे पाण्याचा उपसा करत असतात. ठाणे महापालिका क्षेत्रालाही वेगवेगळ्या प्राधिकरणांमधून पाण्याचा पुरवठा होत असतो. भातसा धरणातील स्वत:च्या पाणी स्रोतामधून ठाणे, कळवा, मुंब्रा भागात महापालिका दररोज सुमारे २०० दक्षलक्ष लिटरइतके पाणी पुरवीत असते. तसेच भिवंडी, मीरा-भाईंदर, ठाणे यांसारख्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम कंपनीकडून १२७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १० रुपये प्रतिलिटर या दराने महापालिका पाणी विकत घेते. एमआयडीसीकडून मिळणारे पाणी मुंब्रा, कळवा या भागांत वितरित केले जाते.
स्टेमची कपात
पाटबंधारे विभागाने पाणी कपातीचा निर्णय लागू केल्याने स्टेम कंपनीला पाणी कपात जाहीर करावी लागली आहे. त्यामुळे ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी या शहरांमध्ये पाणी कपातीचा निर्णय तेथील प्राधिकरणांना घ्यावा लागला आहे. ठाणे शहरात १५ दिवसांतून एकदा २४ तास पाणी पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यानुसार शहराचे दोन भाग करण्यात आले असून, महिन्यातून प्रत्येकी एकदा अशाप्रकारे पाणी बंद ठेवण्याचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मंगेश गीते यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. स्टेमचे पाणी कमी झाल्याने महापालिकेने स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून मिळणाऱ्या पाण्यातून शहरातील पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे, असेही गीते यांनी स्पष्ट केले.
एमआयडीसीची टांगती तलवार
उल्हास नदीवरील बारवी धरणातून औद्योगिक विकास महामंडळासही पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाची पाणी कपात लागू होताच औद्योगिक विकास महामंडळानेही आपल्या कोटय़ातील पाणी कपातीचा विचार सुरू केला आहे, अशी माहिती एमआयडीसीतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. ठाण्याप्रमाणे कल्याण, डोंबिवली या शहरांनाही एमआयडीसीकडून पाण्याचा पुरवठा केला जातो. पाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार ठाण्यासह या शहरांमध्येही पाण्याची कपात केली जाऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले. असे झाल्यास ठाणे शहरात आठवडय़ातून किमान एकदा पाणी बंद राहू शकेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मात्र योग्य नियोजन केल्यास अशी वेळ येणार नाही, असे म्हटले आहे. एमआयडीसीकडून मिळणारे पाणी कळवा आणि मुंब्रा भागात पुरविले जाते, त्यामुळे या भागात कपात होऊ शकते. मात्र आठवडय़ाऐवजी पंधरवडय़ाचे वेळापत्रक आम्ही कायम ठेवू शकतो, असे कार्यकारी अभियंता मंगेश गीते यांनी स्पष्ट केले.