उरण तालुक्यात मागील चार दिवस सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. यामुळे एमआयडीसीने लागू केलेली आठवडय़ातील मंगळवार तसेच शुक्रवार या दोन दिवसांतील पाणी कपातीमधील मंगळवारची पाणी कपात रद्द करण्यात आलेली असून शुक्रवारची पाणी कपात मात्र राहणार असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता एम. के. बोधे यांनी दिली आहे.
उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाणीची पातळी घटल्याने तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीने दोन दिवसांची पाणी कपात लागू केली होती. मात्र मागील आठवडाभरात पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ झालेली आहे. ११६ फुटांची क्षमता असलेल्या धरणात सध्या ९२ फुट पाण्याची पातळी गाठल्याने एमआयडीसीने मंगळवारची पाणी कपात रद्द केलेली आहे. उरण तालुक्यात आतापर्यंत ३३० मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.