पांजरापूर येथील विद्युत उपकेंद्रातील काही कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये १७, १८ व १९ मार्च असे तीन दिवस पाच टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर वांद्रे (पूर्व) येथे होणारी गळती रोखण्यासाठी पालिकेच्या जल विभागातर्फे बुधवारी आणि गुरुवारी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे धारावीमधील काही भागात बुधवारी सायंकाळी, तर गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पांजरापूर येथील विद्युत उपकेंद्रात करंट व पोटेन्शिअल ट्रान्सफॉर्मर्स बदलण्याचे काम १७, १८ आणि १९ मार्च रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील उदंचन केंद्र तीनही दिवशी दीड तास बंद ठेवण्यात येणार आहे. या कामामुळे भांडुप येथील महासंतुलन जलाशयातून कुलाबा ते दादर, सर्व पश्चिम उपनगरे, कुर्ला, घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड परिसरात होणाऱ्या पाणीपुरवठय़ात पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. या तिन्ही दिवशी पाण्याचा दाब व वेळ कमी असेल, असे पालिकेकडून कळविण्यात आले आहे.वांद्रे (पूर्व) येथील स्काडा केबीन जवळील ३६ इंच व्यासाच्या स्टब मेन व २४ इंच व्यासाच्या नवीन पाली जलवाहिनीतून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी बुधवार, १८ मार्च रोजी सकाळी १० वाजता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. हे काम बुधवार, १९ मार्च रोजी दुपारी १ वाजता पूर्ण होईल, असा जल विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यामुळे धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग व दिलीप कदम मार्गावरील नागरिकांना बुधवारी सायंकाळी पाणीपुरवठा पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रेम नगर, नाईक नगर, ६० फुटी मार्ग, जस्मीन मिल मार्ग, ९० फुटी मार्ग, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, कुंभारवाडा परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.