इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रेवतीची वार्षिक परीक्षा सुरू असली, तरी तिचा अर्धा दिवस तरी पाण्यासाठी विहिरीवरच जातो. शालेय परीक्षेपेक्षाही पाणीपरीक्षेच्या बिकट समस्येचे भयावह चित्र अधोरेखित करणारे ठरत आहे. यंदाच्या दुष्काळाने अशा कितीतरी रेवतींच्या शैक्षणिक उभारीलाच खीळ घातली आहे.
उस्मानाबाद शहपासून ११ किलोमीटर अंतरावरील पिंपरी गावातील हे वास्तव आहे. अनेक गावांमध्ये परीक्षेपेक्षा पाणी-परीक्षाच  महत्त्वाची ठरत आहे. आई-वडील मजुरीसाठी शेतावर जातात. अशा वेळी पाण्याच्या घागरीचे ओझे मुलींवर आपसूकच येऊन ठेपते. पिंपरी गावातील दोन शाळकरी मुली जिवाच्या आकांताने पाणी घरापर्यंत नेण्यासाठी भरदुपारी सायकलवरून सहा घागरी नेत होत्या. डोक्यावर सूर्य ओकत होता. शाळकरी मुलींच्या कपाळावरून, कानावरून गालावर घरंगळत घामाचे ओघळ सुरू होते. दुसऱ्या दिवशी भूगोलाचा पेपर. त्याची चिंता वेगळीच. बालवयातच मनाला प्रौढत्व आलेल्या या मुलींनी पाण्याची दाहकता सांगितली. कोटय़वधी रुपयांचा चुराडा पाणीसमस्येवर करणाऱ्या प्रशासनाला पाणी परीक्षेसाठी सुरू असलेला आकांत समजलाच नसल्याची बाब समोर आली.
सायकलवर अडकवलेल्या घागरीतल्या पाण्याला शेवाळाचा वास नि रंग. रंगविरहित, वासविरहित पाणीच पिण्यासाठी वापरा, असे आवाहन करून प्रशासन नामानिराळे झाले. हा वास नि रंग कसा दूर करायचा हा सवाल जैसे थे. गावातल्या प्रत्येक घरात पाणी शुद्ध करण्यासाठी मेडिक्लोअरची बाटली वापरली जाते. शुद्ध पाणी प्या, असे आवाहन करणाऱ्या प्रशासनाने क्लोरिन लिक्विडसुद्धा उपलब्ध करून दिले नसल्याची खंत अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या दीपाली गांधले हिने व्यक्त केली.  दहावीची परीक्षा सुरू असताना गावापासून दोन किलोमीटर अंतरावरून विहिरीत उतरून पाणी आणावेच लागत होते, अशी प्रतिक्रिया पूनम गांधले या मुलीने दिली. पाणी-परीक्षेचा ताण या मुलींच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. दहावीला किती गुण मिळतील, असा प्रश्न पूनमला विचारल्यानंतर तिच्या डोळ्यांनी घागरीतल्या पिवळसर पाण्याकडे पाहातच मूकपणे उत्तर दिले.
मेडिक्लोअरची विक्री वाढली
आठवडय़ातून एखादी बाटली पूर्वी विकली जात होती. आता दिवसाकाठी सात-आठ ग्राहक मेडिक्लोअर खरेदी करीत आहेत, अशी माहिती औषध विक्रेत्याने दिली. परिस्थितीवर मात करण्यासाठी अवगत असलेल्या ज्ञानाचा वापर होत असला, तरी यंदाच्या दुष्काळात अनेक बाबींच्या आर्थिक घडामोडींना वेग आल्याचेही यातून दिसत आहे. क्लोरीन लिक्विड असलेल्या मेडिक्लोअरच्या मागणीने चांगलीच उसळी घेतली आहे.