भारतीय संस्कृतीचे नदीशी वेगळे नाते आहे. नदीला माता समजले जाते. गोदावरी, कावेरी, गंगा, जमुना अशी नद्यांची नावे मुलींना देणे ही संस्कृती किती खोलवर रुजली आहे याचे निदर्शक आहे. युरोप व पाश्चिमात्य देशात एखाद्या नदीचे नाव व्यक्तीला दिल्याचे ऐकिवातही नाही. काही भाग वर्षांनुवर्षे शापित आहे. गेल्या तीन हजार वर्षांपासून काही भागांत सातत्याने दुष्काळ पडतो. उस्मानाबाद, सोलापूर, विजापूर, नगर, औरंगाबाद जिल्ह्य़ांमध्ये वर्षांनुवर्षे दुष्काळ पडतो आहे. सर्वात मोठा दुर्गाडीचा दुष्काळ याच भागात पडला होता. त्यामुळे पाण्याचे नियोजन सतत करण्याची गरज आहे, असे चिंतन इतिहासतज्ज्ञ व जल अभ्यासक डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांनी जलदिनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित जलदिन कार्यक्रमात ते बोलत होते. पाणी हे इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र असायला हवे होते. दुर्दैवाने आपल्याकडे ‘पाण्या’शिवाय इतिहास लिहिला गेला. अलीकडे तर स्थिती अशी आहे की, नदीच म्हणते ‘मी पारोशी आहे’. आता नदीच नाही तर ‘समुद्र वाचवा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पण पाणी एका दिवसात वाढत नाही. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असली तरी त्या लोकसंख्येला पुरेल एवढे स्रोत पूर्वीच निर्माण करून ठेवण्यात आले आहेत, असे मोरवंचीकर म्हणाले. सन १६०५ मध्ये मलिक अंबरने कोणतेही यांत्रिकीकरण न करता पाणीपुरवठा योजना बनविली. आजही अनेक ऐतिहासिक स्रोतांचे बळकटीकरण करण्याची गरज आहे. मनसेच्या वतीने गाळ काढण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले. नुसतेच खिसे रिकामे करून पाणी अडवता येत नाही. त्यासाठी नियोजन गरजेचे आहे. तहान लागल्यावर का असेना तुम्ही आड खणता आहात, यासाठी शुभेच्छा, अशा शब्दांत मोरवंचीकरांनी पाण्याविषयीचे चिंतन मांडले.