ठाणे बेलापूर मार्गावरील खरणे-बोनकोडे आणि रबाळे स्थानकानजीक देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पद्धतीचे स्कायवॉक असल्याचे तोंडसुख घेत राजकीय नेत्यांनी त्याची उद्घाटने केलीत. मात्र कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेले हे स्कायवॉक अवघ्या दोन वर्षांत गळू लागले आहेत. विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने त्यांची डागडुजी न केल्याने ही वेळ आली असून पावसात नागरिकोंना स्कायवॉकमधून छत्रीचा आसरा घेत ये-जा करण्याची वेळ आली आहे. तर रबाळेतील स्कायवॉकची लिफ्ट मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. रबाळे येथील स्कायवॉकसाठी १.५० कोटी तर खरणे येथील स्कायवॉकसाठी २.९० कोटी रुपये खर्च नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आला. मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर या स्कायवॉकमधील छत गळू लागले आहेत. तर स्कायवॉक च्या दोन्ही बाजू उघडय़ा असल्याने पावसाचे पाणी थेट या स्कायवॉकमध्ये येत आहे. या स्कायवॉकची निर्मिती करीत असताना आधुनिक दर्जाचे स्कायवॉक म्हणून जरी गणला गेला असला तरी प्रत्यक्षात मात्र हे स्कायवॉक यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत आहेत. महापालिकेने लाखो रुपये खर्च केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कायवॉकला गळती कशी असा खोचक प्रश्न सध्या नागरिक विचारीत आहेत. रबाळे येथील स्कायवॉकमध्ये अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी बसवण्यात आलेली लिफ्ट सहा महिन्यांपासून बंद आहे. तर या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांची केबिनला गळती लागली आहे. शहरासाठी भूषणावह असलेल्या या स्कायवॉकची साधी डागडुजी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलेली नाही. तर उद्घाटनानंतर लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी त्याची साधी पाहणीदेखील केली नाही.