उरण तालुक्यातील दोन लाख जनता व येथील औद्योगिक परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाणीसाठा कमी झाला असून धरणातील पाण्याच्या पातळीने तळ गाठल्याने रानसई धरणातून पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता असतानाही रानसई धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र पाणी वाचविण्याचे आवाहन करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाचेच याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही पाणीगळती सुरू असल्याचे बोलले जात आहे.
रानसई धरणाची क्षमता कमी असून उरण तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायती, उरण शहर तसेच या परिसरातील औद्योगिक विभागाला याच धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. वाढती लोकसंख्या नागरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे पाण्याची मागणीतही वाढ झालेली आहे. त्यामुळे या विभागांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीला कसरत करावी लागत आहे.पावसाची सुरुवात होईपर्यंत एमआयडीसीला बारवी धरणातून उसणे पाणी घ्यावे लागत असून सध्या रानसई व बारवी या दोन धरणांतील पाणी एकत्रित करून त्या येथील विभागातील नागरिकांना केला जात आहे. सध्या काही दिवस पुरेल इतकेच पाणी रानसई धरणात शिल्लक असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा काही दिवस लांबण्याची शक्यता असल्याने रानसई धरणातील डेड स्टॉकपर्यंत पातळी गेल्यास पाणी कपातीचेही संकट येण्याची शक्यता असताना एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना जासई ते गव्हाण दरम्यान तसेच करळ ते दास्तान दरम्यान लागलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी दररोज वाया जात आहे.