सोलापूर शहरात महापालिकेच्या गलथान कारभारामुळे एकीकडे शहरवासीयांना जलसंकटाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे याच महापालिकेच्या रूपाभवानी मंदिराजवळील पाणीपुरवठा शुध्दीकरण केंद्रात (पाणी गिरणी) पाण्याची गळती होऊन लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे. त्याकडे लक्ष वेधले असताना दुरूस्ती करण्याऐवजी इतर कामांना प्राध्यान्यक्रम दिले जात असल्याने संतप्त तरूणांच्या गटाने पाणी गिरणीवर हल्लाबोल केला. यात मोठय़ा प्रमाणात तोडफोड झाल्याचे सांगण्यात आले.
पाणी गिरणीत लाखो लिटर्स पाणी गळती होऊन त्याचा अपव्यय होत असल्याची बाब पालिका प्रशासनाच्या कानावर घातली असता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वास्तविक पाहता सध्या शहरात जलसंकट कोसळले असताना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महापौर अलका राठोड यांच्यापासून ते आयुक्त अजय सावरीकर व सार्वजनिक आरोग्य अभियंता बी. जी. अहिरे यांच्यापर्यंत सारे जण करीत आहेत. परंतु याच महापालिकेच्या पाणी गिरणीत पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत असल्याचे दिसून येते. त्याविरोधात संतप्त तरूणांच्या गटाने शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास पाणी गिरणीवर हल्लाबोल करून तीव्र प्रतिक्रिया नोंदविली. या ‘हल्लाबोल’मुळे अखेर पालिका प्रशासनाला जाग आली आणि दुपारनंतर पाणी गळती थांबविण्यासाठी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले.
काल गुरूवारी दुपारपासून पाणी गिरणीतील सहा इंची जलवाहिनीला भगदाड पडले होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी गळती होऊ लागली. याबाबतची तक्रार भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी पालिका प्रशासनाकडे करून तातडीने दुरूस्ती काम करण्याची मागणी केली होती. परंतु, शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही हीच स्थिती कायम होती. यात लाखो लिटर्स पाणी गळती होऊन पाण्याचा अपव्यय होत असताना पालिका प्रशासनाला कळवून देखील कसलीच दखल घेतली जात नसल्याबद्दल भवानी पेठेतील तरूणांचा संतप्त जमाव पाणी गिरणीत घुसला. पालिका प्रशासनाने या दुरूस्ती कामाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच कामांना प्राधान्यक्रम दिल्याने या तरूणांच्या भावना अनावर झाल्या. नगरसेवक वल्याळ यांनीही पाणी गिरणीत येऊन परिस्थितीची पाहणी केली व सार्वजनिक आरोग्य अभियंता अहिरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्याचवेळी महापौर अलका राठोड व उपमहापौर हारून सय्यद यांनीही इतर कार्यक्रमात व्यस्त असल्याने पाणी गिरणीत येऊ शकत नसल्याचे कळविले. त्यामुळे संतप्त तरूणांच्या जमावाने कायदा हातात घेत पाणी गिरणीवर हल्लाबोल करून तेथील कार्यालयाची मोडतोड केली.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण व विद्यार्थी सेनेचे विभागीय संपर्कप्रमुख महेश धाराशिवकर हे शिवसैनिकांसह धावून आले. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. दुपारी बारापर्यंत हा हल्लाबोल चालू होता. अखेर घटनचे गांभीर्य पाहून पालिकेची यंत्रणा तेथे दाखल झाली. नंतर लगेचच दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू झाले. दरम्यान, या घटनेप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत पालिका प्रशासनाकडून कोणाविरूध्दही कारवाई झाली नव्हती.