कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि विविध धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या लोकवस्तीला पुराचा धोका पोहचू नये यासाठी अलमट्टी धरणातून प्रतिसेकंद सव्वा लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोमवारपासून करण्यात येत आहे. कोयना, कण्हेर आणि चांदोली धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीतील पाण्याची पातळी २३ फूट ६ इंचावर पोहचली असून उद्यापर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
कृष्णानदीच्या पाणलोट क्षेत्रात गेले पाच दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. कोयना, चांदोली, कण्हेर, धोम, राधानगरी, दूधसागर या धरण परिसरात होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. याशिवाय परिसरातील ओढय़ा-नाल्यांचेही पाणी नदीपात्रात येऊन मिसळत आहे. सध्या वारणा नदी, पंचगंगा दुथडी भरून वाहात आहेत. नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. वारणाकाठी काखे-मांगले मार्गावरील पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिराळा तालुक्यातील कोकरुड, मांगले, चरण, आरळा परिसरात पावसाने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. रात्रंदिवस या परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे.
सोमवारी सायंकाळी सांगली पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोयना धरणातून प्रतिसेकंद २५ हजार ४३८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीत करण्यात येत आहे. याशिवाय सोमवारी दुपारपासून कण्हेर धरणातून १३४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. याशिवाय चांदोली धरणातून प्रतिसेकंद  १४ हजार २८५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आजपासून या धरणातील विसर्गही वाढविण्यात आलेला आहे.
आज दिवसभरात धरण क्षेत्रात पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. आज सायंकाळी पाच वाजता संपलेल्या आठ तासात कोयना येथे १६ मि.मी., चांदोली ११ मि.मी., धोम ३ मि.मी. नवजा १९ मि.मी. आणि महाबळेश्वर येथे ४६ मि.मी. पावसाची नोंद झाली.
सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने कृष्णा नदीतील पाण्याची पातळी झपाटय़ाने वाढत आहे. नदीच्या तीरावरील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गावांना महापुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने दक्षतेचे आदेश दिले आहेत. कृष्णा पात्रातील पाणी कर्नाटकातील अलमट्टी धरणात अडविण्यात आले असून या ठिकाणी आज अखेरची पाणी पातळी ५१८.५० मीटरवर पोहचली आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात कृष्णा नदीचा प्रवेश होतो त्याठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधारा असून या ठिकाणाहून कृष्णेतून होणारा पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद १ लाख क्युसेक्स इतका आहे. त्यामुळे पाण्याचा फुगवटा होऊन नदीकाठी गंभीर स्थिती उद्भवू नये याकरिता अलमट्टी धरण व्यवस्थापनानेही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. प्रतिसेकंद १ लाख २४ हजार ९८६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अलमट्टी धरणातून करण्यात येत आहे.
कृष्णा-वारणा नदीपात्रामध्ये धरणाचे पाणी सोडल्याने सांगलीच्या आयर्वीन पुलानजीक सोमवारी सायंकाळी पाणी पातळी २३ फूट ६ इंच होती. या ठिकाणी ४० फूट  इशारा पातळी असून ४५ फुटावर पाण्याची पातळी गेली की सांगली शहराला धोका पोहचू शकतो. २००५ मध्ये आलेल्या महापुरावेळी आयर्वनि पुलानजिक पाण्याची पातळी ५३ फुटावर पोहचली होती. सायंकाळपर्यंत  कोल्हापूर रोडवरील अंकली पुलानजिक २८ फूट, म्हैसाळ बंधाऱ्यानजिक ३५ फूट ६ इंच पाणी पातळी असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.