02 June 2020

News Flash

उजनीने गाठला तळ

सोलापूर जिल्ह्य़ाची भाग्यदायिनी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणी वितरण नियोजनबाह्य़ पद्धतीने होत असून त्याबद्दल प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी गाजत असताना व एकूणच

| January 3, 2013 06:16 am

सोलापूर जिल्ह्य़ाची भाग्यदायिनी म्हणून ओखळल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणी वितरण नियोजनबाह्य़ पद्धतीने होत असून त्याबद्दल प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी गाजत असताना व एकूणच या धरणातील पाण्याचा मुद्दा संवेदनशील बनला असताना, सध्या या धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या धरणातील तब्बल ७ टीएमसी पाण्याचा वापर कसा आणि कोठे झाला, याचा मेळ लागत नाही.
जिल्ह्य़ातील बहुतांश बागायती क्षेत्र उजनी धरणाच्या पाण्यावरच अवलंबून असून सध्या या धरणातील पाणीसाठा जवळपास तळापर्यंत गेल्याने धरणाच्या माध्यमातून ओलिताखाली सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले आहे. यात कोटय़वधींचे नुकसान होऊन शेतकरीवर्ग उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. ही वस्तुस्थिती असताना यंदाच्या दुष्काळात या धरणातील पाण्याचे वाटप नियोजनबाह्य़ पद्धतीने झाल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील सत्ताधारी तथा प्रस्थापित ठरलेल्या राष्ट्रवादीच्या काही लोकप्रतिनिधींनी ‘बळी तो कान पिळी’ या पद्धतीने उजनी धरणातील पाणी गायब केल्याच्या तक्रारी आहेत.
या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांत उजनी धरणातील पाणीसाठय़ाची परिस्थिती अभ्यासली असता या तक्रारींना बळकटी मिळते. म्हणूनच पंधरा दिवसांपूर्वी नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशन काळात उजनी धरणातील पाणी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उजनी धरणातील गायब झालेल्या  पाण्याचा मुद्दा लावून धरला. गेल्या वर्षभरात उजनी धरणातून तब्बल ५२ टीएमसी गायब झाल्याचा मोहिते-पाटील यांचा आक्षेप आहे. कायदा धाब्यावर बसवून नियोजनबाह्य़ पद्धतीने धरणातील पाणी उचलल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मोहिते-पाटील यांनी आक्रमक पद्धतीने केली होती. त्यानुसार अजित पवार यांनी चौकशी करण्याचे मान्य केले. परंतु त्याप्रमाणे चौकशीच्या हालचाली दिसत नाहीत.
उजनी धरणातील पाण्यासाठी गेल्या दीड-दोन महिन्यांत जिल्ह्य़ात सत्ताधारी राष्ट्रवादीसह सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांनी आंदोलने केली. शासनस्तरावर बैठका व चर्चा झाल्या. माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी या प्रश्नावर आमदारकीवर  ‘पाणी’ सोडण्याचा इशाराही दिला होता. परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. धरणातून पाणी मिळत नाही आणि पाणी मिळण्याची शक्यताही जवळपास संपुष्टात आली आहे. तर याच कालावधीत या धरणातील पाण्याची परिस्थिती विचारात घेतली असता १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत धरणातून तब्बल १३.६७ टक्के एवढा पाणीसाठा कमी झाला आहे. गेल्या १ नोव्हेंबर रोजी या धरणातील पाणीपातळी- ४९२.०३२ मीटर, एकूण पाणीसाठा-२०१०.४३ दलघमी व उपयुक्त पाणीसाठा-२०७.३० दलघमी एकूण पाणीसाठा-७०.९९ टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा-७.३२ टीएमसी व पाण्याची टक्केवारी १३.६७ एवढी होती. तर दोन महिन्यांनी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी धरणातील पाण्याची पातळी-४९१.१०७ मीटर, एकूण पाणीसाठा-१८१७.८६ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा-१५ दलघमी, पाणीसाठा टीएमसी-६४.१९ टीएमसी व उपयुक्त पाणीसाठा-०.५३ टीएमसी तर पाण्याची टक्केवारी केवळ १ वर खालावल्याचे दिसून येते. म्हणजे गेल्या दोन महिन्यांतील माहिती तपासली असता यात १९२ दलघमी म्हणजे तब्बल ७ टीएमसी पाणी कमी झाल्याचे लक्षात येते. पंढरपूरच्या कार्तिकी वारीसाठी २५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. (प्रत्यक्षात हे पाणी पंढरपूरच्या चंद्रभागेत पोहोचले नाही.) हा अपवाद वगळता धरणातून कोणताही विसर्ग नसताना एवढे पाणी गायब झाले कसे, असा सवाल शेतकरीवर्गातून उपस्थित होत आहे. उजनी धरणात आजघडीला जेमतेम एक टक्का म्हणजे १५ दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे. हे पाणी गायब होण्याऐवजी भीमा व सीना नदीत उजव्या व डाव्या कालव्याद्वारे सोडले गेले असते तर कोटय़वधींचे होणारे शेतीचे नुकसान टळले असते, अशी चर्चा शेती क्षेत्रातून ऐकायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2013 6:16 am

Web Title: water level of ujani dam is at lowest
Next Stories
1 सखी मंडळाचा सोलापुरात द्विवार्षिक आंतरभारती मेळावा
2 फुले स्मारक जोडण्याची योजना अजूनही कागदावरच
3 अजितदादांच्या पाठबळामुळे आयुक्त बनले सत्ताधाऱ्यांसाठी ‘अवघड जागेचे दुखणे’!
Just Now!
X