मुंबईचा प्रसिद्ध संततधार पाऊस सुरू झाला आणि महानगरपालिकेकडून गेले दोन महिने सुरू असलेले साफसफाईची सर्व आश्वासने फोल ठरली. शंभर टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा मुंबई महानगरपालिकेचा कागदी दावा नेमका किती खरा आहे याचा अनुभव समस्त मुंबईकरांना शुक्रवारी घेतला.
रात्रभरात शहरात पडलेल्या दीडशे मिमी पावसाने शहराचे तलावात रूपांतर केले. गाळाने भरलेल्या नाल्यांमधून पाणीच वाहून गेले नसल्याने भरती नसतानाही सखल भागांसोबतच रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला. नाल्यांमधील पाणी ट्रॅकवर आल्याने अंधेरी ते चर्चगेटदरम्यानची पष्टिद्धr(१५५)म रेल्वेची वाहतूक बंद पडली. नाल्यांमधील कचरा काढलाच गेला नसल्याचे आरोप सातत्याने होत असतानाही महानगरपालिका आपल्या दाव्यांवर ठाम होती. कचऱ्याने ओतप्रोत भरलेले नाले दाखवले जात असतानाही हा केवळ तरंगणारा कचरा आहे, या कचऱ्याखालून पाणी वाहत आहे, असे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले होते. मात्र नाल्यांची सफाई व्यवस्थित केली असती तर मुंबईचे तळ्यात रूपांतर झाले नसते, असा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला.
सखलच नव्हे, सर्वच भागांत पाणी
भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस पडल्यास सखल भागात पाणी तुंबण्याची सूचना पालिकेकडून सातत्याने देण्यात येते. मात्र शुक्रवारी सकाळी कोणतीही भरती नसतानाही सखल भागांसोबतच शहराचे अनेक रस्ते, परिसर पाण्यात गेले होते. परळ, हिंदमाता, दादर या भागात पाणी भरलेच शिवाय अंधेरी, चेंबूर, धारावी, महालक्ष्मी या भागातही पाणी तुंबले होते.

शाळेला बुट्टी
पावसाने सकाळपासूनच जोर धरल्याने मुंबई महानगरपालिकेने शाळांना एक दिवसाची बुट्टी घेण्याचे आवाहन केले. त्यामुळे मुंबईतील बहुतांश शाळांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली. तर मुंबई विद्यापीठाने शुक्रवारी होणाऱ्या सर्व प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे जाहीर केले.
दादर, परळ, लालबाग परिसरात पाणी तुंबू लागल्याच्या बातम्या येऊ लागताच ज्या शाळा सकाळी सात-साडेसातच्या सुमारास भरल्या होत्या त्यांनी मुलांना घरी परत पाठविण्यास सुरुवात केली. तर दुपारच्या सत्रातील मुलांच्या पालकांना सेलफोनवर मेसेज पाठवून शाळा बंद असल्याचा निरोप शाळांनी पाठविला. तर काहींनी दूरध्वनीवरून मुलांच्या पालकांना सूचना दिल्याने मुंबईतील दुपारच्या सत्रातील शाळा बंद राहिल्या.
मुंबई विद्यापीठाच्या काही पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. काही महाविद्यालयांमध्ये सकाळच्या सत्राला येणाऱ्या मुलांना लोकल सेवा बंद असल्याने काही काळ तेथेच मुक्काम ठोकावा लागला.

एरव्ही गजबलेली दक्षिण मुंबई ओस
रात्रभर पडलेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे अक्षरश: दाणादाण उडाली. दक्षिण मुंबईही त्याला अपवाद नव्हती. उलट पावसामुळे मुंबई ठप्प झाली आहे याचा प्रत्यय एरव्ही वाहतूक कोंडी दक्षिण मुंबईतील ओसाड पडलेल्या रस्त्यांवरून येत होता. मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वे सेवा शुक्रवार सकाळपासूनच ठप्प पडल्याने घराबाहेर पडून स्वत:चे हाल करून घेण्यापेक्षा नोकरदारांनी घरी बसणेच पसंत केले. त्यामुळे एरव्ही सकाळी नऊ ते साडेअकरा या वेळेत गजबलेली दक्षिण मुंबईतील सीएसटी-चर्चगेट स्थानके आणि भोवतालचा परिसर अक्षरश: ओसाड पडला होता. या परिसरात या वेळेत नेहमीच मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी असते. शुक्रवारी मात्र चित्र वेगळेच होते. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी खासगी वाहने व टॅक्सी सोडल्या तर हुतात्मा चौकाच्या दिशेने जाणारे रस्तेही ओसाड पडले होते. बेस्टच्या बसही क्वचितच दिसत होत्या. दुपापर्यंत हीच स्थिती होती. मंत्रालयाच्या परिसरातही हीच स्थिती होती.

न्यायालयालाही सुट्टी
एरव्ही कितीही पाऊस पडला आणि वकीलवर्ग पावसामुळे सुनावणीला हजर राहू शकला नाही तरी न्यायालयांचे कामकाज सुरू असते. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा आणि त्यामुळे सर्व सेवा ठप्प पडल्याचा परिणाम न्यायालयाच्या कामकाजावरही झाला. कमर्चारीवर्ग न्यायालयात पोहोचलाच नसल्याने चार न्यायमूर्तीच्या शपथविधीचा कार्यक्रम सकाळी पार पडल्यानंतर न्यायालय प्रशासनाने उच्च तसेच कनिष्ठ न्यायालयांना सुट्टी जाहीर केली. त्यामुळे कसेबसे न्यायालय गाठलेल्या वकिलांनी पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.