दररोज लाखो लिटर पाणी वाया
उरणमधील जेएनपीटी परिसराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे. या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ही गळती थांबवावी तसेच या जलवाहिन्यांवरून होणाऱ्या पाणीचोरीला आळा घालावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
राज्यात आणि रायगड जिल्ह्य़ांत तसेच उरण तालुक्यातील अनेक आदिवासी वाडय़ांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पाणी आणण्यासाठी चार ते पाच किलोमीटरचे अंतर पार करावे लागत आहे, तर अनेक ठिकाणी जिवाचा धोका पत्करून पन्नास ते साठ फूट खोल असलेल्या पाण्यासाठी विहिरीचा तळ गाठावा लागत आहे, अशी पाण्याची स्थिती असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे. गव्हाण फाटा ते जेएनपीटी दरम्यानच्या या जलवाहिनीला गळती लागून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
या गळतीबरोबर या जलवाहिन्यांमधून पाण्याची चोरीही केली जात आहे, अशी तक्रार उरणमधील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र म्हात्रे यांनी केली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता एस. के. दशवरे यांच्याशी संपर्क साधला असता पाणीगळती होत नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र पाणीगळतीबाबत पुरावे सादर केल्यानंतर शटडाऊन घेऊन पाणीगळती थांबविण्यात येईल, असा पवित्रा दशवरे यांनी घेतला आहे.