06 July 2020

News Flash

सोलापुरात दिवाळीच्या तोंडावर पाणीपुरवठा विस्कळीतच…

ऐन दसरा-दिवाळीच्या काळात सोलापुरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून त्यामुळे सामान्य नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे.

| October 30, 2013 02:05 am

ऐन दसरा-दिवाळीच्या काळात सोलापुरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून त्यामुळे सामान्य नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा तांत्रिक अडचणीमुळे विस्कळीत झाल्याचे पालिका प्रशासन स्पष्ट करीत असले तरी ऐन सणासुदीच्या काळातच पाण्यासाठी नागरिकांना ठणठणाट करावा लागत आहे.
१५ दिवसांपूर्वी टाकळी-भीमा पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होनमुर्गी फाटा ते वडगबाळ दरम्यान १.६ किमी नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम गेल्या १७ व १८ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाले होते. मात्र या कामाचे निमित्त पुढे करून शहरात दोन दिवसाआड ऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने अमलात आणला. तीन दिवसाआड पाणीपुरवठा २५ ऑक्टोबपर्यंत केला जाईल व त्यानंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे स्पष्टीकरण त्यावेळी पालिका प्रशासनाने दिले होते. मात्र नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन त्याची चाचणीही घेण्यात आली तरी सुध्दा अद्यापि तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
एकीकडे दोन दिवसाआड ऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठय़ामुळे नागरिक काहीसे नाराज झाले असतानाच पुन्हा सोरेगाव-हत्तुर येथे विद्युत पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे तीन दिवसाआड पाणीपुरवठाही पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यातच दिवाळीच्या तोंडावर पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेली दुरुस्तीची कामे रेंगाळत राहिल्यामुळे पाणीपुरवठा आणखी विस्कळीत झाल्याचे दिसून येते. या विस्कळीत पाणीपुरवठय़ाचा फटका प्रामुख्याने जुळे सोलापूर, होटगी रोड, विजापूर रोड या भागासह अशोक चौक, कुमठा नाका, अक्कलकोट रोड एम. आय. डी. सी. आदी भागांना बसला आहे. या ठिकाणी तब्बल चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.
यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस होऊन उजनी धरण १११ टक्के भरले आहे. उजनी धरणातून सोलापूरला थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. तर टाकळी येथे भीमा नदीवरील औज बंधाऱ्यावरून तसेच हिप्परगा जलाशयातून शहराला पाणीपुरवठा होतो. या तिन्हीही जल उद्भवामध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे खरे तर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. परंतु पाणी असूनही तीन दिवसाआड पाणीपुरवठा, तोही विस्कळीस स्वरूपात होत असल्याबद्दल नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पाणी प्रश्नावर महापालिकेचे पदाधिकारी व बहुसंख्य नगरसेवक संतप्त झाले आहेत. या संदर्भात महापालिकेची विशेष सभा बोलवण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली आहे, तर उपमहापौर हारून सय्यद यांनी पाणीप्रश्नावर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2013 2:05 am

Web Title: water problem on the face of diwali in solapur
टॅग Diwali,Problem,Solapur
Next Stories
1 बचतगटांच्या वस्तूंचे विपणन कोल्हापुरात आता इंटरनेटवर
2 दिवाळीच्या सुटीला कात्री लागल्याने मुले-शिक्षकांच्या आनंदावर विरजण
3 सांगलीतील ६७ वसतिगृहांची झाडाझडती
Just Now!
X