अकरा कोटी रुपये खार्चाची पाणी योजना कार्यान्वीत झाल्याने येथील औद्योगिक वसाहतीचा पाणी प्रश्न सुटला आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळेल, असा विश्वास श्रीरामपूर एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब काळे यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे उद्योगमंत्री असताना माजी खासदार गोविंदराव आदिक यांनी पुढाकार घेऊन उद्योजकांच्या प्रश्नावर बैठक आयोजित केली होती. चव्हाण यांच्या हस्ते औद्योगिक वसाहतीतील बॅ. रामराव आदिक सामायिक सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाणी योजना रस्ते, आदी कामांसाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. भंडारदरा धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी औद्योगिक वसाहतीनजिकच्या साठवण तलावात सोडून त्यावर पाणी योजना राबविण्यास मंजुरी देऊन त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. नुकतीच ही योजना कार्यान्वित झाली असून उद्योगांना आता मुबलक पाणी पुरवठा सुरू झाला आहे असे ते म्हणाले.
औद्योगिक वसाहतीत २२५ लघू व मध्यम उद्योग सुरू असून २ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच नाशिक, औरंगाबाद व नगर येथील औद्योगिक वसाहतीत जागा शिल्लक नसल्याने अनेक मोठय़ा उद्योजकांनी आता येथे प्रकल्पांसाठी जागा मागितली आहे. बॅ. आदिक यांनी ही औद्योगिक वसाहत मंजूर केली. त्यासाठी रांजणखोल व खंडाळा येथील १ हजार १५० एकर जमीन संपादित करण्यात आली. सन १९८८ पासून उद्योग सुरू करण्यात आले. आता १०० लघू उद्योग सुरू आहेत. मध्यंतरी मंदीच्या काळात अनेक संकटे आली. पण आदिक यांच्या पुढाकाराने उद्योगांना १२ कोटींचे अनुदान २५ कोटी विक्री करात सवलत व एक रकमी कर्ज फेड योजनेत २५ कोटींची सवलत मिळाली. त्यामुळे उद्योगांना मंदीतून बाहेर पडता आले. असे काळे म्हणाले.
आदिक यांनी विजेचे सबस्टेशन व एसटी कार्यशाळा, माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी स्वतंत्र टेलिफोन एक्सचेंज, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बियाणे महामंडळाचे प्रोसेसिंग युनिट, सभापती दिलीप वळसे यांनी सरकारी तंत्रनिकेतन, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसाहतीसाठी पाण्याचे आरक्षण ठेवले, चव्हाण यांच्यामुळे पाणीयोजना तर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यामुळे उच्च दाबाचे वीज केंद्र मंजूर झाले. या सर्व नेत्यांनी औद्योगिक विकासाला हातभार लागला असे ते म्हणाले, तसेच
वसाहतीत अद्याप जागा शिल्लक असल्याने नव उद्योजकांनी उद्योग सुरू करावेत असे आवाहन त्यांनी केले.