गणेश चतुर्थीपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी शहर व परिसराला चांगलेच झोडपून काढले. दुपारी दीड तास असा पाऊस झाला की, काही वेळातच रस्ते व सखल भागातून पाण्याचे लोट वाहू लागले. संततधारेमुळे गंगापूरसह दारणा, आळंदी, कडवा, वालदेवी व भावली धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दोन ते तीन धरणांचा अपवाद वगळता उर्वरित धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.
साधारणत: दीड महिना विलंबाने दाखल झालेल्या पावसाने पुढील काळात पावसाची सरासरी भरून काढली. मध्यंतरी पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर गणेश चतुर्थीपासून त्याचे दमदार पुनरागमन झाले. मागील सात दिवसांपासून त्याची हजेरी कायम आहे. गुरुवारी मध्यरात्री सलग काही तास संततधार सुरू होती. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. साधारणत: दीड तास झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहू लागले. सखल भाग जलमय झाले. पायी चालणाऱ्यांसोबत वाहनधारकांना कसरत करावी लागली. खड्डेमय झालेल्या अनेक रस्त्यांची अवस्था धोकादायक बनली आहे. रस्त्यालगत खोदकामामुळे झालेला चिखल रस्त्यावर येऊन वाहनांचे छोटे-मोठे अपघात वाढले आहे. खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका सांगत असले तरी सातत्याने होणाऱ्या पावसामुळे हे रस्ते पुन्हा ‘जैसे थे’ बनण्याच्या मार्गावर आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील काही धरणे पूर्ण भरली असून काही त्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे दारणा धरणातून ९२४०, गंगापूर १६१०, कडवा १२४५, वालदेवी १२४१, भावली ७००, नांदूरमध्यमेश्वर ११३६९ क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.