मनमाडकरांच्या आग्रहास्तव नियोजित वेळापत्रकापेक्षा आधी पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने पाटोदा साठवणूक तलाव संपूर्ण भरण्याची शक्यता कमीच असून आतापावेतो तलाव निम्माच भरला आहे. कालव्यातून होणारी पाणी चोरी यासाठी कारणीभूत असल्याचे मानले जात असून राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस व प्रशासनही या पाणी चोरी प्रकरणी हताश झाले आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतरही पोलीस व प्रशासकीय कारवाईला न जुमानता लागोपाठ आठव्या दिवशी मंगळवारीही पाणी चोरी सुरूच होती.
पालखेडमधून सोडण्यात आलेल्या पाण्याने किमान शहराला पाणी पुरवठा करणारा पाटोदा येथील साठवणूक तलाव पूर्ण भररल्यास मनमाडकर काही प्रमाणात निर्धास्त होऊ शकतात. परंतु तलाव अद्याप केवळ ५० टक्केच भरला आहे. त्यामुळे सध्या सोडण्यात आलेल्या पाण्याने तलाव संपूर्णपणे भरण्याची शक्यता दुरावल्यासारखे वाटत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने अद्याप तलाव न भरण्यास पाण्याची होणारी चोरी हे कारण दिले जात आहे. त्यातच राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर झाला असून भविष्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासन, पोलीस व शेतकऱ्यांमध्ये ठिकठिकाणी वाद होत असून संघर्ष निर्माण होऊ शकतो.
नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी चोरी संदर्भात तक्रार देत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावरून पाणी चोरणाऱ्या २४१ जणांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत. १३ डिझेल पंप जप्त करण्यात आले. जलसंपदा विभागाच्या एका कर्मचाऱ्याविरूध्दही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पालखेड कालवा क्षेत्रात वनसगाव, कानसगाव, दरसवाडी या लासलगावजवळील भागात ९१ जणांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई केली असली तरीही पाणी चोरी होणे बंद झालेले नाही.
पाणी चोरी न थांबल्यास त्या भागात नियमित व प्रासंगिक पाणी आरक्षणही रद्द केले जाईल असा इशारा जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिला आहे.
परंतु या इशाऱ्याचाही पाणी चोरांवर कोणताच परिणाम झालेला नाही.