News Flash

.. पाणीटंचाईचेही सावट

उन्हाळय़ामध्ये गेल्या काही वर्षांपासून नागपूर शहर व जिल्ह्य़ात पाण्याची समस्या गंभीर होत आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत असतानाही अनेक तालुक्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

| May 24, 2014 01:02 am

उन्हाळय़ामध्ये गेल्या काही वर्षांपासून नागपूर शहर व जिल्ह्य़ात पाण्याची समस्या गंभीर होत आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत असतानाही अनेक तालुक्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागपूर शहरातील काही वस्त्यांना पाणीच मिळत नाही. बहुतांश मध्यमवर्गीय व गरिबांच्या वस्त्यांतील नळ कोरड पडले आहेत. या वस्त्यांमध्ये पाणी टंचाई आता नित्याचीच बाब झाली आहे. जिल्ह्य़ातील पाणीटंचाईचे हे चित्र गेल्या दीड दशकापासून विशेष बदललेले नाही. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पाणीटंचाईचा मुद्दा अनेकांचे राजकीय भवितव्य ठरविण्याइतपत ज्वलंत झाला असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण पाणी पुरवठय़ाच्या फसलेल्या योजना, शेती व बागायतीसाठी भूजलाचा होणारा भरमसाठ उपसा, भूजल पुनर्भरणाकडे सातत्याने केले जाणारे दुर्लक्ष, वारेमाप खर्च होऊनही जलसंधारणाचे कुचकामी ठरलेले प्रकल्प, महापालिकेतर्फे ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सची २४ बाय ७ पाण्याची योजना आणि त्यातून नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण, यामुळे नागपूर जिल्ह्य़ातील बहुतांश तालुक्यात आणि शहरात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
पाण्यासाठी बायाबापडय़ांना करावी लागणारी मैलोगणती पायपीट व तुटपुंज्या टँकरद्वारे तहानलेल्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रशासनाचा कार्यक्रम नागपूर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागासाठी नवा नाही.  शहरासाठी मुबलक पाणी उपलब्ध असताना केवळ महापालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍समध्ये नियोजन नसल्यामुळे अनेक वस्त्यांना पाण्यासाठी हिंडावे लागत आहे. मागणी व पुरवठय़ामध्ये असलेली तफावत पाण्याच्या काटकसरीने सहज भरून काढता येण्यासारखी आहे. पण तरीही शहराचा पूर्व, उत्तर, मध्य व दक्षिणेचा भाग तहानलेला असतो. शहरातील काही वस्त्यांमध्ये अखंड पाणीपुरवठा तर मध्यवर्गीय व गरिबांच्या वस्त्यांच्या नशिबी पाण्यासाठी जागरण, असा भेदभाव दिसून येतो.
महापालिकेचा जलप्रदाय विभाग आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सच्या गैरव्यवस्थापनामुळे जनतेला आज पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ज्या भागांमध्ये महापालिकेचा अखंड पाणीपुरवठा तिथे जमिनीखाली पाच सहा फुटांवर पाणीच पाणी, पण जिथे महापालिकेचे पाणी नाही, तिथे जमिनीखालील पाणीही खोलवर गेलेले, अशी विचित्र स्थिती नागपूर शहरात आढळते. महापालिकेतर्फे नेटवर्क आणि नॉननेटवर्क भागात पाणी टंचाई असेल तर टँकरचा पुरवठा निशुल्क केला जातो, असे असताना पश्चिम नागपुरातील काही वस्त्यांमध्ये टँकरचे पैसे घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 1:02 am

Web Title: water scarcity 2
Next Stories
1 बेटांवरील जैवविविधता संरक्षणाची मोहीम व्यापक करावी -परदेशी
2 भाजपतर्फे अनिल सोले; तिरंगी लढत रंगणार
3 भाजप कार्यकर्ते ‘याचि देही याचि डोळा’ शपथविधी सोहळा अनुभवणार
Just Now!
X