डोंबिवली पश्चिमेतील काही भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असताना, कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेल्या एका जलवाहिनीच्या सांध्यांवरून गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात पाणी फुकट जात आहे. अशाच प्रकारचे पाणी कल्याणमधील आधारवाडी जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधून वाहून जात आहे. कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून नेण्यात आलेली ही जलवाहिनी अधिकृत आहे की अनधिकृत असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत. ही जलवाहिनी कोपर, भोपर, आयरे परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळींना पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आल्याची चर्चा या भागात सुरू आहे. घाईने टाकण्यात आलेली ही तीन ते चार इंचाची जलवाहिनी तीन ते चार ठिकाणी फुटली आहे.
मुख्य जलवाहिनीवरून पाणी सुरू झाले की या जलवाहिनींच्या सांध्यांमधून पाण्याचे उंच फवारे गेल्या काही दिवसांपासून उडत आहेत. मात्र स्थानिक रहिवासी, पालिका अधिकारी या विषयाकडे दुर्लक्ष करीत आहेत. लोकलमधील प्रवासी मात्र ये-जा करताना पालिकेच्या जलवाहिनीवरील या उडत्या कारंज्यांचा लाभ घेत आहेत.
कोपर पूर्व, आयरे गाव, भोपर गाव परिसरात रेल्वे मार्गाजवळ भूमाफियांनी अनधिकृत चाळी उभारल्या आहेत. या चाळींना पाणीपुरवठा झाल्याशिवाय रहिवासी राहण्यास येत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या मुख्य जलवाहिनींवरून या भागाला पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न भूमाफियांकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे.
आधारवाडीतही नासाडी  
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी, उंबर्डे भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी २५ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे. या जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या व जलकुंभातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही मोठय़ा जलवाहिन्या फुटलेल्या असल्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी फुकट जात आहे. आधारवाडी परिसराला गेले कित्येक दिवस कमी दाबाने, अनेक भागात पाणीच नाही अशी परिस्थिती आहे. तरीही या जलकुंभातून होणाऱ्या पाण्याच्या नासाडीकडे पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.