डोंबिवली शहराच्या काही भागात मंगळवारी दिवसभर पाणी पुरवठा खंडीत करण्यात आल्याने नागरिकांचे हाल झाले. कोणत्याही पुर्वसूचनेशिवाय पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे बेसावध राहिलेल्या नागरिकांची घागर उताणीच राहीली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात कमी दाबाने पाणी सोडण्यास सुरूवात केल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मंगळवारी दुपारी आणि रात्री पाणी आले नाही. मंगळवारी एक तास पाणी काही कामासाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे काही भागात कमी दाबाने पाणी आले असेल. पाणीपुरवठा बंद करण्यात आला नव्हता, असे पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता तरूण जुनेजा यांनी सांगितले. एमआयडीसीतील रहिवाशांनी वाढीव पाणी देयके आल्याने एमआयडीसीत पाणी न भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमआयडीसीत कमी दाबाने पाणी सोडण्यात येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.  दोन महिन्यापर्यंत रहिवाशांनी पाणी देयके भरणा केली नाहीत तर मात्र पाणी बंद करण्याचा विचार करण्यात येईल, असे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले.