दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी भागातील मुस्ती येथील बसवण्णा वस्ती तांडा व हरनार वस्तीसाठी ४६ लाखांचा निधी राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर झाला. तसेच बक्षी हिप्परगे भागातील चार वस्त्या व तांडय़ांना पाणीपुरवठय़ासाठी ४२ लाखांचा निधी असा सुमारे एक कोटीचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य उमाकांत राठोड यांनी दिली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त भागात बोरामणीसह कासेगाव आदी गावात टँकरने पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर, मुस्ती येथील बसवण्णा वस्ती तांडा व हरनारवस्तीसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर झालेल्या ४६ लाखांच्या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यास यश आले असून ही योजना शासनाच्या बृहत आराखडय़ात समाविष्ट झाल्याची माहिती राठोड यांनी दिली. टंचाईग्रस्त भागात तांदूळवाडी, शिरीषकुमार झोपडपट्टी येथील योजना मंजूर झाल्या असून संगदरी, दर्गनहळ्ळी, गंगेवाडी येथील ग्रामस्थांची टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी आहे. या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूर करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे राठोड यांनी सांगितले.