लातूर तालुक्यातील कारसा, पोहरेगाव बॅरेजेस ते लातूर या ६ कोटींच्या तातडीच्या पाणीपुरवठा योजनेस मंत्रालयात पाणीपुरवठय़ाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बठकीत मंजुरी देण्यात आली.
आमदार अमित देशमुख यांनी यासाठी प्रयत्न केले. लातूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्प क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने मांजरा प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही. पावसाळय़ातच या धरणातील पाणीपातळी जोत्याखाली गेली. ती आजही तशीच आहे. मांजरातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ते जास्तीतजास्त दिवस पुरवण्यासाठी मनपाने लातूर शहराला आठ दिवसांतून एकदा व आता महिन्यातून फक्त तीन वेळेस पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.
मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे गंडी, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांची या वेळी उपस्थिती होती. योजनेत ४ मि.मी. व्यासाची सुमारे सहा किलोमीटरची जलवाहिनी कारसा-पोहरेगाव ते काटगावपर्यंत टाकली जाणार आहे. मांजरा धरणातून आलेल्या जुन्या जलवाहिनीला ही वाहिनी काटगाव येथे जोडली जाणार आहे. दोन पाणबुडय़ांच्या साहाय्याने कारसा-पोहरेगाव बॅरेजेसमध्ये पाणी घेऊन ते हरंगुळ किंवा वरवंटीच्या जलकुंभात सोडले जाणार आहे.