उरण तालुक्यात केगाव ग्रामपंचायतीला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आठवडाभरातून एकदा पाणी भरावे लागत आहेत. यावर उपाय म्हणून सिडकोच्या हेटवणे धरणातील दोन टँकरने केगावला तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा केला जात आहे.

उरण तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यात केगाव ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. या गावात नियमित पाणीपुरवठा होत नाही. लोकसंख्येच्या दृष्टीने ग्रामपंचायतीला दिवसाला किमान एक ते सव्वा लाख लिटर पाण्याची आवश्यकता असताना एमआयडीसीकडून ६० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाण्यांच्या टाक्यांमध्ये पाणी चढविण्यासाठी लागणारी वीज अनियमित असल्याने पाणीपुरवठय़ात अडचणी निर्माण होत आहेत.
उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे केगाव ग्रामपंचायतीला टँकरने पाणीपुरवठय़ाची मागणी केली होती. त्यानुसार सिडकोकडून दररोज २० हजार लिटर पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती केगाव ग्रामपंचयातीच्या सरपंच हेमांगी राजेंद्र ठाकूर व सदस्य कमलाकर तांबोळी यांनी दिली. तसेच एमआयडीसीकडे दोन इंचांऐवजी जास्त इंचाच्या जलवाहिनीची मागणी केली असतानाही ती दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात एमआयडीसीचे उपअभियंता एम. के. बोधे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायतीवर पाण्याच्या देयकाची थकबाकी असल्याने जलवाहिनी वाढवून देता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.