अनेक वर्षांनंतर तेराही तालुक्यांत वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त झालेला पाऊस, ओव्हरफ्लो झालेली व सध्याही तुडुंब भरलेली लहान, मध्यम व मोठी धरणे व हजारो विहिरी, अतिवृष्टीने घातलेले थमान व ओल्या दुष्काळाची मागणी, यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात वा त्यापूर्वी पाणीटंचाई राहणार नाही, असा जिल्हावासीयांचा अंदाज असेल तर तो साफ चुकीचा आहे! कारण, विक्रमी पावसानंतरही जिल्ह्य़ात पाणीटंचाई राहणारच असून ती नेहमीप्रमाणे जून २०१४ पर्यंत जिल्ह्य़ात राहणार, असा विविध शासकीय यंत्रणांचा अंदाज आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यावर बेरजेचे प्रशासकीय राजकारण करणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने विक्रमी पावसानंतरही जिल्ह्य़ातील तब्बल ६३६ गावांना पाणीटंचाई भेडसावणार असल्याचे आपल्या अहवालात नमूद केले आहे. याचा मुकाबला करण्यासाठी विभागाने ११ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
 यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जिल्ह्य़ात विक्रमी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्य़ाची जून ते ऑक्टोबरदरम्यान पडणाऱ्या वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ७१२.६७ (९२६४.७० मि.मी.) असून या तुलनेत यंदा ९८३.७३ मिमी (१२ हजार ७८८ मि.मी.) इतक्या धो धो पावसाची नोंद झाली आहे. संग्रामपूर (१५७.४६ टक्के), शेगाव (१५६.५० टक्के), बुलढाणा (१५२.५५ टक्के), लोणार (१४९.७५ टक्के) या तालुक्यांत तर वार्षिक सरासरीपेक्षा दीडशे टक्के पाऊस झाला. यामुळे जिल्ह्य़ातील लहान, मोठी, मध्यम धरणे, विहिरी तुडुंब भरले. अनेक दशकांपासून १०० टक्के न भरणारे नळगंगा धरण यंदा ओव्हरफ्लो झाले. उर्वरित बहुतेक धरणे पावसाळ्यात ३ ते ४ वेळा ओव्हरफ्लो झाली. जिल्ह्य़ातील ७६ लघुसिंचन प्रकल्प सध्याही तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ात यंदा अजिबात पाणीटंचाई भासणार नाही किंवा नाममात्र पाणीटंचाई राहील, हा सर्वसामान्यांसह भल्याभल्यांचा अंदाज मात्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने साफ चुकीचा ठरविला! जिल्ह्य़ातील शे-सव्वाशे नव्हे, तर तब्बल ६३६ गावांत पाणीटंचाई उद्भवणार असल्याचा शासकीय यंत्रणांचा अंदाज आहे.
७ डिसेंबरअखेर ६ गावांत, जानेवारी ते मार्चदरम्यान १८५ गावांत, तर एप्रिल ते जूनदरम्यान ४४५ गावांना पाणीटंचाई भेडसावणार आहे. या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी १ हजार १२९ उपाययोजनांचा समावेश असलेला ११ कोटी ३ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ५७ गावांतील ६२ विहिरींचे खोलीकरण करण्यात येणार असून यावर ६२ लाख रुपये खर्च होणार आहेत. याशिवाय, ४०४ गावांतील ४४६ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी २ कोटी रुपये, ४१ गावांतील ४१ नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ६१.५० लाख, ५५ गावांतील ८० विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी ४ लाख, २४० गावांत ३६४ नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी २ कोटी ८२ लाख रुपये, ३९ गावांतील ४१ तात्पुरत्या नळ योजनांसाठी ८२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील ७६ गावांना ८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार, असा या यंत्रणांचा अंदाज आहे. यासाठी तब्बल ४ कोटी ९ लाख रुपयांची तरतूद कृती आराखडय़ात करण्यात आली आहे.