महापालिका प्रशासन निष्क्रिय
सर्वपक्षीय नगरसेवकांची महासभेत टीका
कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनातील राजकारण आणि हेवेदाव्यांचा परिणाम म्हणून कल्याण-डोंबिवलीतील जनतेला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, अशी टीका काँग्रेसचे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी पालिकेच्या बुधवारच्या महासभेत बोलताना केली.
सर्वपक्षीय नगरसेवकांनी तब्बल दोन तास आयुक्त रामनाथ सोनवणे यांची अगतिकता, हतबलता आणि निष्क्रियतेवर आसूड ओढून त्यांना नि:शब्द केले. पाण्यासारख्या गंभीर चर्चेच्या वेळी महासभेत नेहमीच आयुक्तांचा कैवार घेणाऱ्या महापौर वैजयंती गुजर मात्र काही वेळ महासभेतून गायब होत्या. सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी विश्वनाथ राणे, वामन म्हात्रे, श्रेयस समेळ यांनी आपल्या प्रभागांमध्ये विविध माध्यमांतून उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
कल्याण पूर्व, पश्चिमेचा काही भाग, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात गेल्या सहा महिन्यांपासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीपुरवठा विभागाला असलेल्या जलअभियंता अशोक बैले यांचा पदभार आयुक्तांनी काढून घेतला आहे. प्रमोद कुलकर्णी यांच्याकडे ढीगभर पदांचे पदभार देण्यात आल्याने त्यांचे एकही काम सुरळीत नाही, अशी टीका राणे यांनी महासभेत केली.
१९९५ नंतर झाली नाहीत एवढी तुफान अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यांना चोरून पाणी वापरले जाते. जनतेसाठीचे पाण्याचे टँकर भूमाफियांना ७०० रुपयांमध्ये पाणीपुरवठा करीत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आयुक्त, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे मोबाइल प्रभागातील जनतेला देऊन त्यांना सतत फोन करण्यास लावण्याचे अनोखे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
कल्याण-डोंबिवलीत दररोज पालिकेच्या जलवाहिनीवरून ७० चोरीच्या पाणी जोडण्या भूमाफियांकडून घेतल्या जातात. यामध्ये पालिका अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. आतापर्यंत पाच हजार चोरीच्या नळ जोडण्या घेण्यात आल्या आहेत, पण एकाही चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दरवर्षी पालिका चौदा कोटींचा तोटा पाणीपुरवठय़ातून सोसत आहे मग पाणी चोरांना पालिका का पाठीशी घालत आहे, असा प्रश्न नगरसेवक वामन म्हात्रे यांनी करून ८ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. श्रेयस समेळ यांनीही उपोषण करण्याचा इशारा दिला.

* पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन नवी मुंबईच्या वाटय़ाचे १४० दशलक्ष लिटर्स पाण्यापैकी काही पाणी केडीएमसीला मिळविण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी आपण स्वत: पुढाकार घेण्यास तयार आहोत, असे विश्वनाथ राणे यांनी सांगितले. या वेळी सत्ताधारी शिवसेना-भाजपने मौन बाळगले, तर मनसेच्या मंदार हळबे यांनी पाण्यासाठी आपण शिष्टमंडळात येण्यास तयार आहोत, असे सांगितले.

*  मार्चमध्ये पाणीपुरवठा सुरळीत  
‘‘कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाई आहे हे खरे आहे. नगरसेवकांच्या तीव्र भावनांवरून ते दिसले. पालिकेचे मोहिली येथील पाणी प्रकल्प मार्च २०१३ पर्यंत पूर्ण झाल्यानंतर शहराला मुबलक पाणीपुरवठा होईल. कल्याण पूर्व, डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पश्चिमेचा काही भाग पाणीटंचाई सोसत आहे. मुबलक पाणी उपलब्ध झाल्यावर जलकुंभांप्रमाणे विभागवार पाणी सोडण्यात येईल.’’
–  आयुक्त रामनाथ सोनवणे