उसाचे क्षेत्र व सिंचन सुविधाही अधिक असणाऱ्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाईही अधिक, म्हणजे टँकर सुरू असे चित्र जालना जिल्ह्य़ासंदर्भात समोर आले आहे.
गेल्या वर्षी पावसाने दगा दिल्यामुळे जिल्ह्य़ात सर्वत्र दुष्काळी स्थिती होती. राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या जालना जिल्ह्य़ात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात होता. आता जुलै महिना सुरू झाला असला, तरी अनेक गावात पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. परंतु जूनअखेरपर्यंत साखर कारखान्यांच्या परिसरात, तसेच उसाचे क्षेत्र अधिक असणाऱ्या अंबड व घनसावंगी तालुक्यात पाणीटंचाई जिल्ह्य़ाच्या अन्य भागापेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.
मे अखेरीस जिल्ह्य़ात ५५६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. पैकी १७० टँकर अंबड व घनसावंगी या २ तालुक्यात होते. जिल्ह्य़ातील एकूण टँकरच्या तुलनेत हे प्रमाण ३१ टक्के होते. त्यानंतर महिनाभराने जूनअखेरीस पावसाच्या हजेरीमुळे जिल्ह्य़ातील टँकरची संख्या २४१ पर्यंत कमी झाली. परंतु त्यात १०५ म्हणजे ४३ टक्के टँकर अंबड व घनसावंगी तालुक्यात होते. मे अखेरीस जिल्ह्य़ातील टँकरद्वारे पाणीपुरवठा होणारी गावे व वाडय़ांची संख्या ५४९ होती. त्यात अंबड, तसेच घनसावंगी तालुक्यातील गावे व वाडय़ांची संख्या १६७ होती. म्हणजे टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या जिल्ह्य़ातील एकूण गावे-वाडय़ांपैकी ३० टक्के संख्या या दोन तालुक्यातील होती. त्यानंतर जूनअखेरीस २८७ गावे-वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १२३ म्हणजे ४३ टक्के गावे-वाडय़ांना संख्या या दोन तालुक्यांतील होती.
जिल्ह्य़ातील चालू असलेल्या चार साखर कारखान्यांपैकी तीन याच दोन तालुक्यात आहेत. अंबड व घनसावंगी तालुक्यात दोन सहकारी व एक खासगी कारखाना आहे. या दोन तालुक्यातील उसाचे क्षेत्र जिल्ह्य़ाच्या उर्वरित तालुक्यांपेक्षा अधिक आहे. कृषी विभागातील नोंदीनुसार २०११ मध्ये जिल्ह्य़ात उसाचे एकूण क्षेत्र १८ हजार हेक्टर होते. पैकी १५ हजार ८०० हेक्टर म्हणजे ८८ टक्के क्षेत्र अंबड व घनसावंगी तालुक्यातील होते. मागील वर्षी जिल्ह्य़ातील उसाचे एकूण क्षेत्र १६ हजार ५०० हेक्टर होते. पैकी १४ हजार ८०० हेक्टर म्हणजे जवळपास ९० टक्के क्षेत्र अंबड व घनसावंगी तालुक्यातील आहे. कमी पावसाचा परिणाम म्हणून चालू वर्षी जिल्ह्य़ातील उसाचे क्षेत्र घटून १३ हजार हेक्टर अपेक्षित आहे. मागील ५ वर्षांचा विचार केल्यास जिल्ह्य़ातील उसाचे क्षेत्र सरासरी १० हजार ९०० हेक्टर आहे. मागील काही वर्षांत ऊसक्षेत्रात जी वाढ झाली ती प्रामुख्याने अंबड व घनसावंगी या ३ साखर कारखाने असलेल्या तालुक्यात झाली आहे.
मागील वर्षी जिल्ह्य़ात सर्वात कमी २२९ मिमी, म्हणजे अपेक्षेच्या तुलनेत ३२ टक्के पाऊस घनसावंगीत झाला. अंबडमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४७ टक्के पाऊस झाला. शासकीय निकषाप्रमाणे संपूर्ण घनसावंगी व अंबड तालुक्यांचा काही भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. जिल्ह्य़ातील सर्वाधिक सिंचनक्षेत्र असणारे हे दोन तालुके आहेत. जिल्ह्य़ातील एकूण सिंचन क्षेत्रापैकी जवळपास ५० टक्के क्षेत्र याच दोन तालुक्यात आहे. गोदावरीवर झालेले नवीन चार बृहत बंधारे (बॅरेजेस) याच २ तालुक्यात आहेत. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील हे तालुके आहेत.