News Flash

धो धो पाऊस पडूनही गावपाडे तहानलेलेच!

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडूनही ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई भेडसावू लागली आहे.

| April 2, 2014 06:54 am

धो धो पाऊस पडूनही गावपाडे तहानलेलेच!

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडूनही ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखडय़ानुसार तब्बल ३५८ गाव-पाडय़ांमधील रहिवाशांना पाण्याची चणचण भासणार आहे. गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही मोखाडा आणि धरणांचा तालुका असा लौकिक असणाऱ्या शहापूर तालुक्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे आहेत. या भागातील नादुरुस्त पाणी योजनांची दुरुस्ती, पाणीपुरवठय़ासाठी टँकर तसेच बैलगाडय़ांसाठी नऊ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
संपूर्ण मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी धरणे असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई भेडसावते. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याच्या असमान वाटपाबाबत असंतोष आहे. मुंबई महानगर प्रदेश परिसराची भविष्यातील पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी प्रस्तावित काळू तसेच शाई या अनुक्रमे मुरबाड व शहापूर तालुक्यातील धरणांना तीव्र विरोध होण्याचे ते एक महत्त्वाचे कारण आहे. जिल्ह्य़ातील १०७ गावे आणि २५१ पाडे टंचाईग्रस्त ठरविण्यात आली आहेत. शहापूर तालुक्यातील ३९ गावे, १२० पाडे तर मोखाडा तालुक्यातील ३० गावे आणि ४६ पाडे यंदा टंचाईग्रस्त आहेत. मुरबाडमधील १७ गावे- ३३ पाडे, जव्हार तालुक्यातील सात गावे आणि १२ पाडे, विक्रमगडमधील पाच गावे आणि २२ पाडे, वाडय़ातील दोन गावे-२२ पाडे, कल्याणमधील सहा गावे व चार पाडे, भिवंडीतील एक पाडा, वसई तालुक्यातील एक गाव-एक पाडा टंचाईग्रस्त आहे. चार तालुके टंचाईमुक्त पुरेसे पर्यायी जलस्रोत उपलब्ध असल्याने जिल्ह्य़ातील पालघर, डहाणू, तलासरी आणि अंबरनाथ हे चार तालुके पाणीटंचाईमुक्त झाले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2014 6:54 am

Web Title: water shortage in thane district
Next Stories
1 अनाथ श्वानांची मावशी
2 ठाण्यातील सीसी टीव्हीला निधीची वानवा
3 दुरुस्तीच्या नावाने चांगभलं
Just Now!
X