उरणमध्ये गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून तालुक्यातील २५ ग्रामपंचायती, उरण शहर तसेच वाडय़ा व ओएनजीसी, जेएनपीटीवर आधारित गोदामे तसेच खाजगी उद्योगांना पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. एमआयडीसीने सतर्कता म्हणून तालुक्यात पाणीकपात सुरू केली आहे. मात्र यंदा पुरेसा पाऊस न पडल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या हेटवणे धरणाच्या जलवाहिनीतून रानसई धरणाला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनीची जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे उरणकरांवरील पाणीटंचाईचे संकट सध्या तरी टळले आहे.
दहा दशलक्ष घनमीटरची क्षमता असलेल्या उरणच्या रानसई धरण परिसरात मार्च २०१४मध्ये ९९.८ फूट पाणी होते, मात्र ही पातळी मार्च २०१५मध्ये ९७.४ पर्यंत घटली. यानंतर एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ात कपात करून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.
यंदा रानसई धरणातील पाणीसाठा कमी होऊ नये याकरिता हेटवणे धरणाच्या जलवाहिनीवरून रानसईत १० हजार दशलक्ष लिटर पाणी उरणकरांसाठी मिळणार असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता एम. के. बोधे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.