हिंगोली जिल्हा परिषदेत शुक्रवारी  एका बैठकीची चर्चा निष्पळ ठरली, तर दुसरी बैठक समाजकल्याण सभापतींच्या अनुपस्थितीमुळे बारगळली. स्थायी समितीच्या सभेत जुन्याच अतिक्रमणाच्या विषय चर्चेत आला, समिती नेमण्याचे ठरवून तो निष्फळ ठरला.  तर पुरजळ सिद्धेश्वर पाणीपुरवठय़ाच्या विषयावर मोरवाडी पाणीपुरवठय़ाच्या धर्तीवर शिखर समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.
जि. प. स्थायी समितीची सभा जि. प.अध्यक्ष मीनाक्षी बोंढारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या ताब्यातील जागांवर झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा सदस्य गजानन देशमुख यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांंपासून यावर चर्चा होते. पीपल्स बँकेनजीक अतिक्रमण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कृषी विभागाने ही जागा ताब्यात घेतली होती, असे त्यांनी सांगितले. मात्र, योग्य उत्तर मिळण्याऐवजी जागेची मालकी, जागेवरील ताबा, बांधकाम परवानगी, असे मुद्दे चर्चेत आले. प्रथम जागा मालकीची करून घेतल्यानंतरच अतिक्रमण काढण्याबाबत निर्णय घेता येईल, असे उत्तर देण्यात आले. त्यावर  देशमुख म्हणाले, जागा आपल्या ताब्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या बाजूने निकाल दिल्यानंतरच ते अतिक्रमण पंचनामा करून काढण्यात आले होते. त्याच जागेवर परत अतिक्रमण झाले कसे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या अतिक्रमणाच्या मुद्यावर सर्व संबंधिताची एक बठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याची सूचना त्यांनी केली. सेनगाव येथील जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दासुद्धा या बठकीत गाजला.
आरोग्य विभागाच्या विषयावर सदस्य विनायकराव देशमुख यांनी कापडसिंग नावाचे वैद्यकीय अधिकारी सतत गरहजर असतात, अशी तक्रार केली.
दुसऱ्या बैठकीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे व सहकारी हजर होते. मात्र, समाजकल्याण सभापती आले नाहीत. दलित वस्ती निधीच्या नियोजनासाठी ही बैठक होती. आता ही बैठक १९ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. १४ कोटी २३ लाख रुपयांच्या निधी वाटपावरून हिंगोलीत सत्ताधारी गटात वाद झाले होते. या पाश्र्वभूमीवर ही बैठक होणार होती, ती बारगळली.