अक्कलकोट शहरात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती भीषण झाली असून सध्या सांगवी जलाशय व हालचिंचोळी तलाव कोरडा पडल्याने तसेच भीमा नदीवरील हिळ्ळी बंधारा ते अक्कलकोट या २७ किलोमीटर जलवाहिनी शेतीच्या पाण्यासाठी वारंवार फोडली जात असल्यामुळे अक्कलकोटचा पाणीपुरवरठा संकटात आला आहे. सध्या बारा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ अक्कलकोट नगरपालिकेवर आली आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
दरम्यान, प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अक्कलकोटमध्ये पाणीपुरवठय़ासाठी दररोज १५ टँकरची सोय केली असली तरी टँकरच्या खेपा नियमित नसल्यामुळे अक्कलकोटच्या नागरिकांना मिळेल तेथून किंवा खासगी टँकरचे पाणी अक्षरश: विकत घ्यावे लागत आहे.
अक्कलकोट शहरासाठी दररोज ८० लाख लिटर पाणी लागते. त्यासाठी सांगवी जलाशय व हालचिंचोळी तलाव तसेच हिळ्ळी बंधाऱ्यातून पाणी घेतले जाते. मात्र यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे सांगवी जलाशय कोरडा पडला आहे. हालचिंचोळी तलावाचीही हीच स्थिती आहे. भीमा नदीवरील हिळ्ळी बंधाऱ्यातून जलवाहिनी योजनेद्वारे अक्कलकोटला पाणीपुरवठा होतो. परंतु सध्याच्या दुष्काळी स्थितीत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी जलवाहिनी फोडली आहे. २७ किलोमीटर अंतराच्या या जलवाहिनी योजनेला वारंवार गळती होत असल्यामुळे त्याची दुरूस्ती करता करता पाणीपुरवठा यंत्रणेच्या नाकी नऊ येत आहे. परिणामी अक्कलकोटला पाणीपुरवठा होणे मुश्किलीचे झाले आहे. त्यामुळे सध्या बारा दिवसांनंतर एकदा पाणीपुरवठा करावा लागत आहे.
दरम्यान, अक्कलकोट शहराच्या या पाणीप्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे. हिळ्ळी जलवाहिनी योजनेच्या दुरूस्तीसाठी दोन कोटी ३७ लाखांचा  खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी मक्तेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.