उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्यात टंचाईची तीव्रताही प्रखर होऊ लागली आहे. मार्चच्या पहिल्या आठवडय़ातच जिल्ह्यातील ५५ गावांना ४५ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
अत्यल्प पावसामुळे जळगाव जिल्हा याआधीाच दुष्काळी म्हणून जाहीर झाला आहे. त्यातच अलिकडे झालेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे केळी, गहू, हरभरा, मका पिकांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे अंतीम काम नुकतेच पूर्ण झाले असून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. अत्यल्प पावसामुळे भूजल पातळी खालावत आहे. अनेक पाणी पुरवठा योजना कोरडय़ा पडू लागल्या आहेत. अंतीम पर्याय म्हणून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक असल्याने २९ गावांमध्ये सद्यस्थितीत २४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यानंतर जळगाव तालुक्यातील सहा, अमळनेर चार, पारोळा सहा, पाचोरा तालुक्यातील तीन गावांमध्ये टँकर सुरू आहेत. पुढील दोन महिन्यात टंचाईची स्थिती जशी वाढत जाईल, त्याप्रमाणे टँकरची मागणी वाढत जाणार आहे.
नियोजन समितीने दुष्काळी स्थिती पाहता पाणी पुरवठय़ासाठी टँकर खरेदी करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून टँकर खरेदी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या जात असून कोणत्याही पाणी योजनेसाठी निदी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालक मंत्री गुलाब देवकर यांनी दिली आहे. ज्या भागात टंचाईची तीव्रता अधिक तेथे विंधन विहिरींची कामे सुरू केली जात आहेत. तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. जळगाव शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणातील उपयुक्त पाणीसाठा कधीच संपला असून मृत साठय़ातून शहराला सध्या तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यापुढील टंचाईची संभाव्य तीव्रता लक्षात घेता महापालिकेने प्राधिकरणाच्या माध्यमातून मृत साठय़ातून पाणी घेण्यासाठी विशेष योजना तयार केली आहे. सुमारे दोन कोटीपेक्षा अधिक खर्चाच्या या योजनेसाठी शासनाकडून एक कोटी ३४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.