परभणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कामगारांनी विविध मागण्यांसाठी गुरूवारपासून बेमुदत संप पुकारला. याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर झाला.
पाणीपुरवठा व अन्य विभागांतील कामगार-कर्मचाऱ्यांचे वेतन सहा महिन्यांपासून थकले आहे. या कर्मचाऱ्यांना सुट्टय़ाही दिल्या जात नाहीत. नियमानुसार मिळणारा महागाई भत्ता व कालबद्ध पदोन्नतीचाही लाभ देण्यात आला नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांच्या तीन महिन्यांच्या वेतनासाठी राखीव फंड ठेवण्याची तरतूद असतानाही तसे झाले नाही. वेतन नसल्याने सर्व कामगार कर्जबाजारी झाले आहेत. महापालिका कामगारांना वेतन देऊ शकत नसेल, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाणीपुरवठा योजना व कर्मचारी वर्ग करण्याचा विचार का करण्यात येत नाही, असा सवाल कामगारांनी केला.
पाणीपुरवठा विभागातील कामगारांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने चर्चाही केली नाही. कामगारांनी वेळोवेळी संप, आंदोलने केली. परंतु प्रशासन खोडसाळपणे मागण्या पूर्ण करीत नाही, असा आरोप मनपा कामगार कर्मचारी युनियनने केला. त्यामुळे गुरूवारपासून पाणीपुरवठा विभागातील कामगार संपावर गेले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहील, असा निर्धार युनियनचे सरचिटणीस कॉ. राजन क्षीरसागर, शेख आयुब, काशिनाथ वाघमारे, मनोहर गवारे, प्रकाश जाधव, गणेश गायकवाड, सय्यद नाजम, चंद्रकांत मोरे आदींनी पत्रकान्वये केला.