सोलापूर जिल्ह्य़ात दुष्काळाची झळ चांगलीच बसत असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील तहानलेल्या ४०१ गावे व दोन हजार वाडय़ा-वस्त्यांना सुमारे पाचशे टँकरद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा करावा लागत आहे. टँकरच्या संख्येत झालेली वाढ ही उच्चांकी समजली जात आहे.
जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. सद्य:स्थितीत २२७ चारा छावण्यांच्या माध्यमातून एक लाख ८३ हजार ७५८ जनावरांसाठी चाऱ्याची सोय करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्य़ात दुष्काळाचे संकट कायम असल्याने पाणी व चाऱ्याच्या प्रश्नाची दाहकता वाढली आहे. १९७२ सालापेक्षा अधिक भीषण परिस्थिती यंदाच्या दुष्काळात अनुभवाला येत असल्याचे ग्रामीण भागातून बोलले जात आहे. मात्र यंदाचा दुष्काळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याची प्रतिक्रिया प्रकर्षांने व्यक्त होत आहे. जिल्ह्य़ातील टंचाईग्रस्त भागातील गावे व वाडय़ा-वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरच्या खेपांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. सध्या टँकरच्या खेपा एक हजार २४६ पर्यंत गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.