तालुक्यातील ३८ गाव पाणी योजनेंपैकी निमगाव मढ, कातरणी आणि धानोरे या गावांतील ग्रामपंचायतींनी अनुक्रमे ५१ हजार, २२ हजार आणि २१ हजार रुपये एवढय़ा रकमेची पाणीपट्टी थकवल्यामुळे या गावांचा पाणीपुरवठा आठवडय़ापासून बंद करण्यात आला आहे. परिसरात कुठेही अन्य पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे या गावांमधील ग्रामस्थांसमोर पिण्यासाठी पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तालुक्यातील किंवा या योजनेतील बहुतेक ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न जेमतेमच आहे. पाणीपट्टी वसुलीतूनच ग्रामपंचायती ३८ गाव योजनेचे देयक अदा करतात, मात्र काही ग्रामस्थ जाणूनबुजून पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करतात, असे म्हणणे सरपंच व ग्रामसेवकांनी मांडले आहे. निमगाव मढ ग्रामपंचायतीकडे ५१ हजार रुपये पाणीपट्टी थकीत आहे. त्यांना दोन-तीन वेळा सवलत देऊनही त्यांनी पैसे भरले नाहीत. केवळ सहा हजार रुपयांचा धनादेश त्यांनी दिला, परंतु ग्रामपंचायतीच्या खात्यावर पैसेच नसल्याने तो दोनदा परत आला.