News Flash

विदर्भाच्या प्रकल्पातील जलसाठा घटला

विदर्भातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमधील जलसाठा झपाटय़ाने घटला असून यंदा पावसाचे प्रमाण कमीच असल्याचा हवामान खात्याचा अंदाज पाहता पाणीटंचाईच्या किंबहुना भीषण दुष्काळाच्या

| June 21, 2014 06:59 am

विदर्भाच्या प्रकल्पातील जलसाठा घटला

विदर्भातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमधील जलसाठा झपाटय़ाने घटला असून यंदा पावसाचे प्रमाण कमीच असल्याचा हवामान खात्याचा अंदाज पाहता पाणीटंचाईच्या किंबहुना भीषण दुष्काळाच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी तीन-चार महिने विदर्भाला अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यात थैमान घातले. यावर्षी केवळ फेब्रुवारी व मार्चमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर विभागातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर व भंडारा या सहा जिल्ह्य़ांतील २ लाख, २० हजार, ४६६ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला असला तरी यंदाचा उन्हाळा विदर्भाला तापदायक ठरला. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान नोंदवले गेले. मार्चपासूनच तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, वाशीम, यवतमाळ आदी प्रमुख शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला. नागपूरसह ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावतीत पारा सरासरी ४५ ते ४७ अंशापर्यंत पारा चढला. त्यामुळे विदर्भातील विविध जलाशयांमधील पाणीसाठाही वेगाने कमी झाला.
विदर्भात १६ मोठे, ४० मध्यम, तर ३१० लघु प्रकल्प आहेत. पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या जलाशयांमधील साठा तापमानाने कमी होऊ लागला. मोठय़ा प्रकल्पात मे मध्ये सरासरी १८४८ दशलक्ष घनमीटर, मध्यम प्रकल्पात १९६ दशलक्ष घनमीटर पाणी होते. एप्रिलमध्ये प्रशासनाने घेतलेल्या नोंदीत दहा टक्के साठा कमी झाला असल्याचे उघड झाले होते. नागपूर जिल्ह्य़ातील तोतलाडोहमध्ये एप्रिलमध्ये ६, रामटेकमध्ये ४, तर वेणामध्ये ८ टक्के पाणी कमी झाले होते. नागपूर जिल्ह्य़ातील मध्यम तेरा प्रकल्पात एप्रिल महिन्यात ३५ टक्के पाणी होते. मे महिन्यात ३० टक्के झाले.
जलसंपदा खात्यातून १६ जूनला उपलब्ध विदर्भातील मोठे, मध्यम व लहान प्रकल्पातील पाणी साठय़ाच्या नोंदी पाहता भविष्यात गंभीर संकट तर निर्माण होणार नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे. सर्वाधिक क्षमतेच्या तोतलाडोहमध्ये ४८४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४६ टक्के, वर्धा जिल्ह्य़ातील पोथरा धरणात ६ टक्के, नागपूर जिल्ह्य़ातील कान्होलीबारा धरणात ७ टक्के, वडगाव व गोंदिया जिल्ह्य़ातील पुजारीटोला धरणात केवळ १५ टक्के, तर चंद्रपूरच्या इरई धरणात ४८ टक्केच पाणी होते. गोंदियातील कालीसरार प्रकल्पात एक दशलक्ष घनमीटरही पाणी नाही. १६ जूनला विदर्भातील सोळाही मोठय़ा प्रकल्पात एकूण १ हजार ३०३ दघमी (४५ टक्के) पाणी होते. विदर्भातील मध्यम प्रकल्पात १६ जूनला २० टक्के, तर लघु प्रकल्पात १८ टक्के पाणी साठा होता. गोंदिया जिल्ह्य़ातील कालीसरार, नागपूर जिल्ह्य़ातील सायकी, वर्धा जिल्ह्य़ातील मदन उन्नयी आदींसह अनेक प्रकल्प कोरडे झाल्यागत आहेत.
यंदाचा उन्हाळा भीषण गेला. विदर्भातील ९०९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवली. गेल्या वर्षी अतिवृष्टीने तुडुंब भरलेले प्रकल्पही कोरडे पडले आहेत. आता पावसाला सुरुवात झाली असली तरी ती केवळ हजेरीच ठरली आहे. तीसुद्धा विदर्भातील काही भागातच.  गेल्या दोन दिवसात विदर्भात अत्यल्प पाऊस झाला. हवामान खात्याने यंदा पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कमी पावसामुळे येत्या काळात भीषण परिस्थिती निर्माण होईल, हे स्पष्ट आहे. विदर्भातील जलसाठय़ांच्या नोंदी गंभीर परिस्थितीची चाहूल देणाऱ्या ठरल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2014 6:59 am

Web Title: water supply reduce in vidarbh project
टॅग : Nagpur
Next Stories
1 ‘वनहक्क कायद्याबाबतच्या तरतुदींवर अंमलबजावणीचे आव्हान’
2 नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान, १४ उमेदवार रिंगणात
3 शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान,
Just Now!
X