मालेगाव तालुक्यातील माळमाथा २४ गाव पाणी पुरवठा योजनेला राज्य शासनाने सुधारीत मान्यता दिली आहे. वाढीव खर्चासह २७ कोटी ८२ लाख रुपये किमतीचा प्रस्ताव मंजूर झाला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे.
यापूर्वी माळमाथा व २४ गावे पाणी पुरवठा योजनेच्या १८ कोटी ४९ लाखाच्या ढोबळ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तथापि, काही अपरिहार्य कारणांस्तव योजनेच्या खर्चात १० कोटी १७ लाखाने वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर, या योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. वित्त विभागाने वाढीव खर्चावरील नऊ टक्के वजा करून उर्वरित सुधारीत प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ती कार्यान्वित करेल. मूळ प्रशासकीय मंजुरीवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असेही शासनाने म्हटले आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर ती संबंधित ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या ताब्यात देण्यात यावी, ही योजना पूर्ण झाल्यावर महिनाभराच्या आत ताब्यात घेण्यासंबंधीची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेवर राहील.
कॅगच्या अहवालानुसार राज्यातील २१ टक्के पाणी पुरवठा योजना या देखभाल-दुरुस्ती अभावी तसेच वीज देयके न भरल्यामुळे बंद पडल्याचे लक्षात येते. त्यामुळे ही योजना आर्थिकदृष्टय़ा सक्षम राहण्यासाठी पाणीपट्टी दरात गरजेनुसार वेळोवेळी वाढ करण्यास सुचविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत पाणीपट्टीची आकारणी करेल.
ग्रामपंचायतीने तशा आशयाचा ठराव केल्याशिवाय उर्वरित कामे हाती घेऊ नयेत, असे सूचित करण्यात आले आहे. योजनेत १०० टक्के घरगुती नळ जोडण्यांचा समावेश करावा, पुन्हा ही योजना पुर्नसुधारीत केली जाणार नाही याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.