पाथरी तालुक्यातील झरी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून बांधलेल्या लघुसिंचन तलावातील पाणी ग्रामस्थांना पिण्यास व सिंचनाला दिले जात नसल्याने ग्रामस्थांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनात दबाव गटानेही सहभाग घेतला.
झरी येथील ५० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून लघुसिंचन तलाव बांधण्यात आला. तलावावरून खेर्डा, बोरगव्हाण, खेडूळा आदी गावांना सिंचनास पाणी दिले जाते. तसेच २० वर्षांपासून मानवत शहराला याच तलावातून पाणीपुरवठा होतो. परंतु झरी ग्रामस्थांना पाणी दिले जात नाही. झरी गावासाठी टेकडय़ावर विहीर बांधली. परंत विहिरीला पाणी नसल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली. झरी ग्रामस्थांनी हक्काचे पाणी मागितले असता ते देण्यास नकार देण्यात आला. मानवत शहराला लोअर दुधना प्रकल्पाच्या ईरळद बंधाऱ्यातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असताना अजूनही झरीच्याच तलावातून मानवतला पाणीपुरवठा केला जात आहे. गावाजवळ पाणी असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांनी दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. धरणे आंदोलने केली. परंतु पाणी देण्याऐवजी गावाला पाणीयोजनेच्या रोहित्रातून मिळणारी वीजही बंद करण्यात आली. दोन्ही बाजूंकडून अन्याय सुरू झाल्याने ग्रामस्थांनी अखेर शनिवारी धरणे आंदोलन केले.
सकाळीच झरी येथील ग्रामस्थ ७-८ मोठय़ा वाहनांतून परभणीत दाखल झाले. शिवाजी पुतळ्यासमोरील मदानावर महिलांसह ग्रामस्थांनी धरणे धरले. जिल्हा दबाव गटानेही यात सहभाग घेतला. दबाव गटाचे अॅड. प्रताप बांगर, विश्वनाथ थोरे, रमेश माने, विनायक सत्त्वधर, शेतकरी संघटनेचे अमृत िशदे, बालासाहेब केसकर, सुधाकर सत्त्वधर, चंद्रहास सत्त्वधर, बाळाराम राऊत, अनिल सत्त्वधर, मुंजा सत्वधर आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांची भेट घेऊन लक्ष वेधले. गावात ग्रामसभा घेऊन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांना सांगण्यात आले.