तुळजापूर तीर्थक्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या नळदुर्गच्या बोरी धरणातील पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे. त्यामुळे शहराचे पाणीसंकट ऐन पावसाळ्यात अधिकच गडद झाले आहे. तुळजापूरवासीयांसह जगदंबेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्यावर येऊन ठेपली आहे. ऐन पावसाळ्यात बोरी धरण कोरडे पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नगराध्यक्षा विद्या गंगणे, गटनेते नारायण गवळी, माजी उपनगराध्यक्ष दिलीप गंगणे, मुख्याधिकारी डॉ. संतोष जिरगे, नगरसेवक पंडित जगदाळे, बाळासाहेब िशदे, दयानंद हिबारे, राजेश िशदे, अमर हंगरगेकर, विजय कंदले, पाणीपुरवठा अभियंता अशोक सनगले यांनी नुकतीच बोरी धरणाची पाहणी केली. चांगला पाऊस झाल्यास धरणात पाणीसाठा वाढेपर्यंत तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. जिरगे यांनी या काळात केवळ दोन वेळा पालिका शहराला पाणी देऊ शकणार असल्याचे सांगून, रामदरा तलावातील िवधन विहीर व नव्याने घेण्यात येणाऱ्या बोअरमधून मिळणाऱ्या पाण्यातून जलशुद्धीकरण केंद्रामार्फत शहरवासीयांची तहान भागविण्यात येणार असल्याचे सांगितले. शहराला एका वेळेला २० लाख लिटर पाणी लागते, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता अशोक सनगले यांनी दिली. बोरी धरणात पाच ते आठ फूट गाळ शिल्लक आहे. धरणात थेंबभरही पाणी नसल्याने येणारा काळ अत्यंत अडचणीचा राहणार आहे. जनतेने पाण्याची बचत करून पाणी वापरावे, पावसाचे पाणी साठवून त्याचा घरगुती कामासाठी वापर करावा. पावसाळा असल्याने छतावरून पडणारे पाणीही साठवून त्याचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक येतात. शहरवासीय व भाविकांसाठी दररोज सुमारे २० लाख ते २५ लाख लिटर पाण्याची गरज आहे. शहरात चार टाक्यांमधून हा पुरवठा केला जातो. सन १९७२ च्या दुष्काळातही हे धरण कोरडे पडले नव्हते. या वर्षी अजूनही पाणी साठवणूक करण्याइतपत पाऊस न झाल्याने धरण कोरडे पडले आहे. नळदुर्ग व अणदूर गावांचाही पाणीपुरवठा धोक्यात आला आहे. आगामी काळात मोठा पाऊस न झाल्यास केवळ १० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या धरणात शिल्लक आहे. त्यामुळे नळदुर्ग, अणदूरसह तुळजापूरवासीयांवर ऐन पावसाळ्यात जलसंकट ओढवले आहे.