कमी पर्जन्यमान, कोरडे होत असलेले पाणीस्रोत, भूगर्भातील खालावलेली पाणीपातळी यामुळे या जिल्ह्य़ातील शहरी व ग्रामीण भाग भीषण पाणीटंचाईच्या विळख्यात सापडला आहे. पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेता शासकीय यंत्रणांकडून होणाऱ्या उपाययोजना तोकडय़ा पडू लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अदूरदर्शी व नियोजनशून्य कारभारामुळे उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिस्थितीची दाहकता व प्रशासनाची निष्क्रियता अशीच राहिल्यास जिल्ह्य़ात फार मोठे पाणीयुध्द पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या जिल्ह्य़ाचे सरासरी पर्जन्यमान आठशे मिलीमीटर असतांना जिल्ह्य़ात केवळ  व त्रोटक स्वरूपाचा अडीचशे मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे जिल्हाभर भयावह पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नळगंगा, खडकपूर्णा, कोराडी, पेनटाकळी, वान या प्रकल्पांमध्ये पिण्याच्या पाण्याएवढाच साठा उपलब्ध आहे, मात्र जिल्ह्य़ातील पाणीस्रोत असलेले बहुतांश म्हणजे नव्वद टक्के सिंचन प्रकल्प क ोरडे होण्याच्या बेतात आहेत. तलाव, साठवण बंधारे, विहिरी, विंधन विहिरी यातील पाणी आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. भूगर्भातील पाणीपातळी मोठय़ा प्रमाणावर झपाटय़ाने खाली गेली आहे. विंधन विहिरींना दोनशे फुटापर्यंत पाण्याचा थेंबही लागत नसल्याची वस्तूस्थिती आहे. जिल्ह्य़ातील १४१९ आबाद गावांपैकी सुमारे १०५० गावे भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे.
जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईच्या निवारणासाठी सुमारे १५८४ उपाययोजना प्रस्तावित केल्या असून त्यापैकी ४८० उपाययोजना पूर्णत्वाकडे जात आहेत. जिल्हा प्रशासनाचा ग्रामीण भागासाठी असलेला १७ कोटी १० लाखाचा बृहत निवारण आराखडा शासनाने मंजूर केला तरी देखील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जूनअखेर २५ कोटी रुपये लागणार आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत शंभर टॅँकरने, तर शहरी भागात चाळीस टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. असे असले तरी आणखी एकशे पन्नास टॅंकर लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. याशिवाय, शहरी विभागात जिल्ह्य़ाचे मुख्यालय बुलढाण्यात पंधरा दिवसांनी, चिखलीत दहा दिवसांनी, देऊळगावराजात महिनाभराने, सिंदखेडराजात पंधरा दिवसांनी, लोणारमध्ये दहा दिवसांनी, मलकापुरात दहा दिवसांनी, नांदुऱ्यात आठवडाभराने, खामगावात पाच दिवसांनी, जळगाव जामोदमध्ये चार दिवसानंतर, मेहकर व शेगावात चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे.  
सर्वात भयावह अवस्था बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा व सिंदखेडराजाची आहे. देऊळगावराजा व सिंदखेडराजात खडक पूर्णा प्रकल्पावरून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बुलढाणा व चिखली ही शहरे जणू काही वाऱ्यावर सोडण्यात आली आहेत. बुलढाण्यात पाणी वितरणाचे संपूर्ण नियोजन ढासळले आहे. पेनटाकळी पुरक योजना व येळगाव धरणातील विंधन विहिरीतून ३५ लाख लिटर पाणी उपलब्ध असतांना ते पाणी वितरण व्यवस्थेतील सदोष कार्यपध्दतीमुळे नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. जिल्हा प्रशासन व नगर प्रशासन ही जबाबदारी एकमेकांवर ढकलून नागरिकांशी प्रतारणा करीत आहेत.
खरे म्हणजे, भीषण पाणीटंचाई असली तरी त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन व अधिनस्त यंत्रणा नियोजन व कृती कार्यक्रमात कमी पडत आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा, जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, तहसील व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीत प्रशासकीय समन्वयाचा अभाव व दप्तर दिरंगाईचा फटका पाणीटंचाईला बसत आहे. यावर जिल्हा प्रशासनाने अधिक कृतीशील होण्याची आवश्यकता आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी बी.जी.वाघ व निवासी उपजिल्हाधिकारी बी.के.इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासन पाणीटंचाईच्या संदर्भात अधिक गतीमान करण्यात येणार असून जिल्ह्य़ात पाणीटंचाई निवारणाच्या युध्द पातळीवर व प्रभावी उपाययोजना करण्यात येतील. यासाठी पैसा कमी पडणार नाही. या कामात कुचराई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात एक हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून नागरिकांनी पाणीटंचाईच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी सरळ संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.