‘कॅन्सर’ या आजाराभोवती भीतीचे वलय निर्माण झाले आहे. आपल्याला कॅन्सर आहे हे एकूणच अनेकजण आता आपले शेवटचे दिवस राहिले आहेत, अशी समजून करून घेतात. तसेच नातेवाईक वा मित्रमंडळीही त्या व्यक्तीकडे त्याच नरजेतून पाहतात. प्रत्यक्षात कॅन्सरवर योग्य व वेळेवर उपचार केले तर त्यातून कॅन्सरग्रस्त व्यक्ती सहीसलामत बाहेर पडू शकते, याची अनेकांना कल्पना नाही. आणि याचे मुख्य कारण म्हणजे, कॅन्सरविषयी लोकांमध्ये असलेले अज्ञान व त्यातून निर्माण झालेले अनेक गैरसमज!
समाजातले कॅन्सरविषयीचे अज्ञान दूर करण्यासाठी तसेच कॅन्सरविषयी वैज्ञानिक माहिती पोहोचविण्यासाठी ठाण्यातील प्राची व शशांक सरपोतदार हे दाम्पत्य अथक प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून या दोघांनी इंजिनीअस प्रॉडक्शनतर्फे जनहितार्थ  ‘वुई कॅन सर्टनली विन’  हा माहितीपट तयार केला आहे.
गेले वर्षभर महाराष्ट्रभर फिरून त्यांनी कॅन्सरच्या तज्ज्ञांकडून कॅन्सरविषयीची माहिती गोळा केली. सध्या महाराष्ट्रात कॅन्सरविषयी नेमकी परिस्थिती काय, कॅन्सर होण्यामागची कारणे, या आजाराबाबत समाजात असलेली अनास्था याविषयीचा आढावा या माहितीपटात घेण्यात आला. शहर आणि गावपातळीवर कॅन्सरविषयीचे नेमके चित्र काय आहे, याबाबतची सद्यस्थिती या माहितीपटात आहे. कॅन्सरचे विविध प्रकार, त्यामागची कारणे, कॅन्सर होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी. कॅन्सर बरा होण्यासाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या पर्यायी उपचारपद्धती यांचाही आढावा या माहितीपटात घेण्यात आला आहे. तसेच कॅन्सरवर यशस्वीपणे मात केलेल्या लोकांच्या मुलाखतीही यात आहेत. या माहितीपटात डॉ. सरोज बावडेकर यांनी पती डॉ. बावडेकर यांनी कशा प्रकारे कॅन्सरशी यशस्वीपणे लढा दिला, हे सांगितले आहे. ऋजुता कुशलकर, स्मिता तळवलकर यांनी कॅन्सरग्रस्तांनी कॅन्सरकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर आपण त्यावर कशी मात करू शकतो, हे सांगितलं आहे. कॅन्सरवर माहितीपट करण्याची कल्पना कशी सुचली, याविषयी सांगताना प्राची म्हणाली की, माझ्या नातेवाइकांपैकी एकांना कॅन्सर झाल्याची बातमी कानावर आली, तेव्हा माझीही पहिली प्रतिक्रिया होती- ‘अरे बाप रे!’ दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना मला कॅन्सरविषयी अधिक माहिती होत गेली. केमोथेरपी, रेडिएशन अशा अनेक उपचारपद्धतींविषयी कळले. परंतु यादरम्यान मला प्रकर्षांने जाणीव झाली ती सुशिक्षित असूनही कॅन्सरविषयी असलेल्या अज्ञानाची! मग मनात एक विचार चमकून गेला की सुशिक्षितांची ही अवस्था तर अशिक्षितांचं काय? मग कॅन्सरविषयी अनेकजणांकडून जाणून घेतलं, त्यावर काम केलं. मग जनजागृतीसाठीच एक माहितीपट तयार करण्याचा निश्चय केला. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. या कामात कॅन्सरवरील तज्ज्ञ मंडळींचे मोलाचे सहकार्य मिळाले. कुठलीही अपेक्षा न ठेवता या माहितीपटासाठी डॉ. विकास गोसावी, डॉ. सुरज पवार, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. पराग कुमठेकर, डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ. चेतना बक्षी, डॉ. मकरंद कोचीकर, डॉ. एस. पी. सरदेशमुख, डॉ. यशवंत तोरो, डॉ. सुवर्णा पाटील अशा तज्ज्ञ मंडळींनी मदत आणि मार्गदर्शनही केलं. हा माहितीपट करताना दत्तात्रय सरपोतदार, दिनकर दामले, सुधाकर ओजाळे या ज्येष्ठांचाही मोलाचा पाठिंबा मिळाल्याचं प्राची सांगते.या माहितीपटाबरोबरच एक पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली आहे. या पुस्तिकेत कॅन्सरविषयी माहिती देणारे तज्ज्ञांचे लेख आहेत. कॅन्सरविषयीची माहिती देतानाच त्यावरील उपलब्ध असलेले उपचार आणि सकारात्मक संघर्षांच्या कथाही या पुस्तिकेत आहेत. कोणतीही आर्थिक अपेक्षा न करता हा माहितीपट शहरांमधून व गावागावांमधून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा या सरपोतदार दाम्पत्याचा मानस आहे. त्यासाठी अनेक संस्थांनी पुढे येऊन हा माहितीपट ठिकठिकाणी प्रदर्शित करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.