ज्येष्ठ शिक्षणतज्ञ म. वि. तथा मामासाहेब कौंडिण्य यांच्या निधनाबद्दल जिल्ह्य़ात शोक व्यक्त करण्यात आला. केवळ शिक्षण क्षेत्रच नव्हे तर, संवेदनशील समाजकारणी हिरावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.  
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात- आयुष्यभर शिक्षण कार्यात वाहन घेतलेल्या कौंडिण्य सरांनी रचनात्मक कार्यासाठी महाविद्यालयातून युवकांची मोठी फौज जिल्ह्याला दिली. कमवा आणि शिका योजना राबवून त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात दिला. त्याचबरोबर स्वावलंबी शिक्षणासाठी त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. राज्यात महाविद्यालयाचा लौकीक निर्माण करणाऱ्या कौंडिण्य सरांच्या निधनाने शिक्षणक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
माजी खासदार बाळासाहेब विखे- नवी संकल्पना घेऊन त्यांनी संगमनेर कॉलेजचा पाया रचला. ग्रामीण व अदिवासी भागासाठी सतत काम करताना संगमनेर व अकोले तालुक्यात विविध प्रकल्प राबवण्याची त्यांची इच्छा होती, ते शक्य झाले नाही तरी शेती व पाण्यावरील गप्पांमधुन त्यांनी केलेल्या सूचना अधिक महत्वपूर्ण होत्या. शेतीला पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याची त्यांनी केलेली सूचनाही सामाजिक विचारांची होती.
माजी मंत्री बी. जे. खताळ- संगमनेर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून आल्यानंतर त्यांचा परिचय झाला. त्यांनी महाविद्यालयाला नावारुपाला आणले. आपल्या कार्यकौशल्याने, शिस्तबध्द प्रयत्नाने त्यांनी महाविद्यालय नावारुपाला आणले. सामाजिक, राजकीय कामातही ते रस घेऊ लागले. सामाजिक कामात अधिक रस असल्याने सरकारी मदतीतून त्यांनी अनेक विकासात्मक कामे केली. समाजवादी विचारसरणीकडे त्यांचा कल होता. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केले. त्यांचे कार्य पुढे सुरु राहावे.
शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी- संगमनेर महाविद्यालयाच्या उभारणीत कौंडिण्य सरांचा सिंहाचा वाटा होता. प्रयोगशील, कृतिशील आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून ते परिचित होते. मुक्तांगण, पुनर्रचित अभ्यासक्रम या प्रयोगामुळे त्यांची ख्याती सर्वदूर गेली. ग्रामीण, गरीब विद्यार्थी शिकले पाहिजेत ही त्यांची तळमळ होती. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक भीष्म पितामह काळाच्या पडद्याआड गेला.