‘आमच्या प्रभागातील कामे मंजूर करताना तुमच्या हाताला लकवा मारतो काय?’ या शिवसेनेचे नगरसेवक विठ्ठल मोरे यांच्या टीकेला उत्तर देताना, ‘आमच्या मनगटात आजही ताकद आहे,’ असे उत्तर देऊन आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी आपली जरब दाखवून दिली आहे. काही महिन्यांपूर्वी आयुक्तांनी असाच बाणा महापौरांनादेखील दाखविला होता. विशेष म्हणजे मोरे यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी व स्थानिक नेतृत्वाने नाराजी व्यक्त करताना प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. काही नगरसेवकांनी तर स्थायी समिती सभा संपल्यानंतर आयुक्तांकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे या लकवा प्रकरणात मोरे एकाकी पडल्याचे दिसून येते.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर एका महिन्याने नवी मुंबई पालिकेची गुरुवारी स्थायी समिती सभा पार पडली. त्यात मोरे आणि आयुक्तांमध्ये झालेल्या बाचाबाचीमध्ये लकवा प्रकरण चांगलेच गाजले. मोरे दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते. राष्ट्रवादीचे स्थायी समिती सभापती पदही त्यांनी भोगले आहे. तो पक्ष सोडून ते पुन्हा स्वगृही शिवसेनेत आले. त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीमधून निवडून आलेल्या नगरसेवकपदाचा राजिनामा दिल्याने तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत ते निवडून आले.
पालकमंत्री गणेश नाईक यांनी त्यांना पराजित करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. तेव्हापासून त्यांच्या प्रभागातील नागरी कामे होत नाहीत. आयुक्त नाईकांच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी आयुक्तांच्या हाताला लकवा झाल्याची उपमा दिली. ही उपमा देताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा झाला काय असे बोलू शकतात तर मी बोललो त्यात काय बिघडले अशा तऱ्हेने ते आपल्या वक्तव्याचे समर्थन करीत आहेत.
मात्र पवार यांनी ‘सरकारला धोरणलकवा’ झाला आहे का, असे म्हटल्याचे मोरे विसरल्याचे दिसून येते. त्यांच्या या वकत्वाला आक्षेप घेताना आयुक्त जऱ्हाड यांनी आमच्या मनगटात आजही ताकद आहे. त्यामुळे लकवा मारण्याचा प्रश्न येत नाही, असे उत्तर दिले आहे. लकवा हा एक आजार आहे. तो कोणाला व्हावा अशी अपेक्षा करणे गैर आहे. मोरे यांनी मला उद्देशून त्या आजाराचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आम्ही ठणठणीत असल्याचे त्यांना सांगण्याची आवश्यकता होती. मोरे यांनी माफी मागावी अशी अपेक्षा आयुक्तांनी केली आहे तर माफी मागणार नाही, अशी भूमिका मोरे यांनी घेतली आहे. मोरे यांच्या टीकेनंतर आयुक्तांनी आपल्या सर्व अधिकाऱ्यांसह सभात्याग केला. त्यामुळे हा बहिष्कार आता किती दिवस राहणार याची चर्चा सुरू झाली आहे. आयुक्तांनी बाणेदार उत्तर देऊन आपली जरब दाखवून दिली.
 नागरी कामे करताना आपण दुजाभाव करीत नाही. दोन दिवसांपूर्वीच मोरे यांच्या प्रभागाचा आपण पाहणी दौरा केल्याचेही त्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी महापौर सागर नाईक यांनी २५ लाख रुपये खर्चाआतील कामांच्या मंजुरीचे अधिकार आयुक्तांना नसल्याचे वक्तव्य केले होते. त्या वेळी आयुक्तांनी एक महिना या कामाच्या प्रस्तावांना मंजुरी देणे बंद करून आपला कणखरपणा दाखवून दिला होता. आयुक्तांच्या या भूमिकेवर नंतर महापौरांनादेखील नमते घ्यावे लागले होते. त्यामुळे अपमान करणाऱ्या सर्व नगरसेवकांबरोबर आयुक्तांची भूमिका सारखीच असल्याचे दिसून येते.