खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पूर्वी विधानसभा व जिल्हा परिषदेसाठी आमच्या विरोधात काम केले असले तरी ते आता काँग्रेसचे उमेदवार आहेत. आघाडीचे धोरण म्हणून आम्हाला त्यांना ‘सहन’ करावेच लागेल. त्यांच्याबाबत राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर काही शंका, कुशंका असतील तर त्यांच्याबरोबर चर्चा करता येईल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी मांडली.
ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षाच्या सर्व उमेदवारांची यादी रविवारी मुंबईतच जाहीर होईल. नगर दक्षिणचा उमेदवारही त्याच वेळी जाहीर केला जाईल, राजीव राजळे व आ. बबनराव पाचपुते इच्छुक आहेत, अशी माहिती पिचड यांनी दिली.
सध्या ‘अनेक हवा वाहत’ असल्या तरी महाराष्ट्रात राष्ट्रवादीला काळजीचे कारण नाही, कारण आम्ही खूप काम केले आहे. मी पालकमंत्री असल्याने जिल्हय़ातील दोन्ही जागांची जबाबदारी माझ्यावरच आहे. मी स्वत: गेल्या सात निवडणुकांत एकदाही पराभव स्वीकारलेला नाही, त्यामुळे जिल्हय़ात माझ्यावर जबाबदारी असताना काळजीचे कारण नाही, असा दावा त्यांनी केला. माझ्यासह पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी आता थांबण्याचा व नव्या पिढीकडे जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पुन्हा एकदा या वेळी बोलताना स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री बाळासाहेब थोरात व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे हे तिघे वाकचौरे यांना मुंबईत माझ्याकडे घेऊन आले होते. जिल्हय़ात मी ज्येष्ठ असल्याने ते माझ्याकडे आले होते. वाकचौरेंची उमेदवारी हा काँग्रेसचा निर्णय आहे. पक्षाच्या धोरणाप्रमाणे मला काम करावे लागेल, असे मी त्यांना सांगितले, अशी माहितीही पिचड यांनी दिली.
जि. प. बाबत काँग्रेसच उदासीन!
लोकसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांतील भाजप-सेनेबरोबर असलेली आघाडी तोडली जाईल, असे ठरले होते. त्याकडे लक्ष वेधले असता, पालकमंत्री पिचड यांनी काँग्रेसकडूनच दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट केले. हा निर्णय झालाच आहे, नगरला मी तशा सूचनाही दिल्या आहेत. राजीनामे द्या म्हणूनही सांगितले आहे, परंतु काँग्रेसकडून अद्याप प्रतिसाद नाही, असे पिचड म्हणाले.