कृषी खात्यातील अनुरेखक संघटनेच्या तांत्रिक मागण्या मान्य करण्याचे आश्वासन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी काल संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना दिले.
श्री. विखे यांनी अनुरेख सुधारित पत्रक, तांत्रिक सहायक, आरेखक, तांत्रिक पर्यंवेक्षक याला सुधारित पदनाम देण्यास मंजुरी दिली. संघटनेच्या कार्यालयासाठी सरकारच्या जुन्या इमारती उपलब्ध करुन देण्यासाठी, तसेच संयुक्त समन्वय समिती सुरु करण्याचे मान्य केले. २४ वर्षांची दुसरी पदोन्नती देण्याचे त्यांनी मान्य केले.
कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, दुष्काळाचा मोठा गंभीर प्रश्न सध्या जाणवत आहे, त्यादृष्टीनेही अधिकाऱ्यांनी काम करावे, दुष्काळामुळे १० हजार कोटी रुपयांचा कोरडवाहू शेतीसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे, ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू असल्याने दीर्घकालीन योजनेसाठी हे मिशन तयार करण्यात आले आहे, पशुधन वाचवण्यासाठी वैरण विकासाचा कार्यक्रम खात्याने हाती घेतला आहे, २१ मंडळांना मोबाईल सेवा लवकरच सुरु केली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएस सेवा सुरु होईल, असे विखे म्हणाले.
संघटनेचे राज्य सचिव शशिकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी अध्यक्ष ए. व्ही. क्षीरसागर यांनी आभार मानले. राजपत्रित अधिकारी महासंघाचे ग. दि. कुलथे, राहुरीचे सभापती शिवाजीराव गाडे, अन्वर शेख, सदानंद राऊत, प्रभाकर देवकर आदी उपस्थित होते.