नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघातील विविध समस्या, विकासाची कामे, पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणे माझे कर्तव्य आहे. केवळ पदवीधर मतदारसंघातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात विकासाच्या कामांना वेग देईल, अशी ग्वाही भाजप, शिवसेना, रिपाई आठवले महायुतीचे उमेदवार प्रा. अनिल सोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढत असलेले अनिल सोले पूर्व विदर्भाच्या झंझावाती दौऱ्यावर आहेत. चंद्रपुरात त्यांनी पत्रकारांजवळ मनोगत व्यक्त केले. प्रा. सोले म्हणाले, विदर्भातील पदवीधरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच त्यांच्या शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक जिल्ह्य़ात एक फोरम स्थापन केला जाईल. नागपूर येथील मिहान प्रकल्पातून जवळपास २ लाख रोजगार उभार करण्याचा मानस आहे. २०२० मध्ये आपला देश सर्वाधिक तरुण असेल, पण या देशातील तरुणांना रोजगार मिळाला नाही तर त्यांचे हात या राष्ट्राच्या बळकटीकरणात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे रोजगार ही आपल्या प्राधान्याचा विषय आहे. येथील पदवीधर मतदारांना आपण निराश करणार नाही. प्रत्येक जिल्ह्य़ात जाऊन दरवर्षी आपण केलेल्या कामाची प्रसिद्धी करणार आहे. शिवाय, जिल्हा नियोजन बैठका आणि जिल्ह्य़ाच्या अन्य विकासात्मक बैठकांमध्येही योगदान देणार, असे आश्वासन त्यांनी दिले.
पक्षाचे समर्थक, कार्यकर्ते व असंख्य पदवीधरांच्या बळावरच आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. दिवं. पं. बच्छराजजी व्यास, रामजीवन चौधरी आणि गंगाधर फडणवीस यांचा वारसा लाभलेला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय परिश्रमपूर्वक सांभाळलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात मला उमेदवारी मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे, याची जाणीव आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना गडकरी यांनी राज्यात विकासाचा झंझावात आणला, तोच आपल्या सगळय़ांच्या सहकार्याने आणखी पुढे नेण्याच्या संकल्प घेऊनच मी भाजपने दिलेली उमेदवारी स्वीकारली आहे. भाजपच्या ज्येष्ठांनी व सहकाऱ्यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती समर्थपणे पार पाडू आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करील.
या परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणे हेच आपले पुढचे ध्येय असेल, असेही प्रा. सोले म्हणाले.