दुष्काळात अनेक विकासकामे होतात असा राज्याच्या सन १९७२, १९९२, १९९६ मधील दुष्काळाचा अनुभव आहे. त्यामुळे दुष्काळ ही इष्टापत्ती समजून ठोस विकासकामे करून घेण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केले.
दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी गांधी यांनी मतदारसंघाचा दौरा सुरू केला असून त्याअंतर्गत नगर तालुक्यातील अरणगाव, वाळकी, देऊळगावसिद्धी, गुंडेगाव, राळेगण म्हसोबा, रुईछत्तीसी, साकत आदी गावांचा दौरा त्यांनी केला. तहसीलदार राजेंद्र थोटे, गटविकास अधिकारी एस. डी. शिंदे, कृषी अधिकारी एम. आर. देशमुख, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नाथ शेळके यांच्यासह शाम पिंपळे, दादा बोठे, बाळासाहेब पोटघन, दिलीप भालसिंग, श्रीकांत साठे, महेश वाघ आदी कार्यकर्ते त्यांच्यासमवेत या दौऱ्यात सहभागी झाले होते.
देऊळगावसिद्धी येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत गांधी यांनी दुष्काळी स्थितीला सामोरे जाताना त्याचे नियोजन आतापासून करणे आवश्यक आहे, असे सांगितले. प्रशासनाने कार्यक्षमता दाखवणे
गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्यासाठी घोसपुरी पाणी योजना सुरू करणे गरजेचे होते, मात्र प्रशासन असमर्थ ठरले. आतातरी त्यांनी ही योजना सुरू करावी, असे गांधी यांनी सांगितले. ग्रामस्थांनीही गटतट, राजकारण विसरून या स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.