अहमदनगर महानगर माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षकांमध्ये अद्ययावत घडामोडी, शिक्षण क्षेत्रातील बदल, शैक्षणिक प्रकल्प, समस्या, अडचणी यासाठी विकसित केलेले संकेतस्थळ निर्माण केले असून त्याचे उद्घाटन आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षकांवर पडणारा कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा, असे आवाहन तांबे यांनी यावेळी बोलताना केले. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शहरातील ल. भा. पाटील विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी शिक्षक सभासद नोंदणीचा शुभारंभ माजी आमदार व रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य दादा कळमकर यांच्या हस्ते करण्यात आला.
संघटनेचे सचिव शंकरराव बारस्कर यांनी प्रास्ताविकात संकेतस्थळाची माहिती दिली. संकेतस्थळाच्या निर्मितीसाठी सहसचिव घनशाम सानप, गणेश उघडे, महादेव भद्रे, विष्णू मगर, रमेश जाधव, सचिन गावडे, हेमलता साळवी, पोपट लोंढे आदींनी सहकार्य केले. संजय निकड्र यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक धनंजय जाधव, संघटनेचे अध्यक्ष उद्धव गुंड, राजेंद्र लांडे, अप्पासाहेब शिंदे, तसेच कैलास मोहिते, ज्ञानदेव पांडुळे, प्रभाकर खणकर, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट अहमदनगरटीडीएफ डॉट ऑर्ग’ असा संकेतस्थळाचा पत्ता आहे.